Tue, Mar 26, 2019 07:41होमपेज › Aurangabad › रुग्णालयाचा हलगर्जीपणा भोवला

रुग्णालयाचा हलगर्जीपणा भोवला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

गारखेडा परिसरातील माणिक रुग्णालयाला सोमवारी सकाळी आग लागली आणि एकच गोंधळ उडाला. जनरल वॉर्ड खाक झाला. याचे चटके रुग्णालयासह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनाही सोसावे लागले. रुग्णालयाचा अग्‍निरोधक यंत्रणेबाबतचा हलगर्जीपणा चांगलाच भोवला. दीड महिन्यापूर्वीच फायर ऑडिट झाल्याचा दावा रुग्णालयातर्फे करण्यात आला. मात्र, फायर बंब रिफिल न करणे, यंत्रणा अद्ययावत नसल्यानेच आगीने रौद्र रूप धारण केल्याचे ‘दै. पुढारी रिअ‍ॅलिटी चेक’मध्ये समोर आले.

गारखेड्यात सकाळी अकराच्या सुमारास आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे लोट दिसू लागले आणि परिसरात एकच धांदल उडाली. तळमजल्यात थाटलेल्या जनरल वॉर्डाच्या बाजूलाच वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंगचीच ठिणगी आगीस कारणीभूत ठरल्याचे तपासणीसाठी आलेल्या प्रत्यक्षदर्शी रुग्णाच्या नातेवाइकाने सांगितले. रुग्णसेविका आगीची माहिती वरिष्ठांना देईपर्यंत वॉर्ड पेटला होता. एकच धांदल उडाली. भेदरलेल्या बहुतांश स्टाफने रुग्णालय सोडले आणि बांधकाम सुरू असलेल्या समोरच्या इमारतीचा आधार घेतला. अग्‍निशामक दल, पोलिस, स्टाफमधील काही धाडसी आणि सजग नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य यशस्वीरीत्या पार पडले. सलमान नवाब पटेल नावाच्या युवकाने रुग्णालयातील फायर यंत्रणेचा पाईप काढला आणि रक्षकास पाणी सुरू करण्याचे सांगितले, येथेच बिंग फुटले. रक्षकाने यंत्रणा काहीच कामाची नसल्याचे सांगितले. रिफिल न केलेले फायर बंबही संतप्‍त नागरिकांनी अस्ताव्यस्तपणे फेकून दिले. प्रतिनिधीने यावरील रिफिलची अंतिम तारीख तपासली, 11 मार्च रोजीच ती संपली होती. रुग्णालयाचा फायर सेफ्टीबद्दलचा हलगर्जीपणा चांगलाच अंगलट आला.


  •