होमपेज › Aurangabad › मतदानावरून विद्यापीठात हाय व्होल्टेज ड्रामा

मतदानावरून विद्यापीठात हाय व्होल्टेज ड्रामा

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:34AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

व्यवस्थापन परिषद निवडणुकीसाठी प्रभारी अधिष्ठाता आणि अधिकार्‍यांना मतदानाचा हक्‍क देण्यावरून विद्यापीठात रण पेटले आहे. उत्कर्ष पॅनलच्या सदस्यांनी 12 प्रभारींची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी करत प्र-कुलगुरूंच्या दालनात सोमवारी (दि. 28) ठिय्या मारला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्याशी त्यांची यावेळी जोरदार खडाजंगी झाली.

मंगळवारी (दि. 29) सायंकाळपर्यंत याबाबत कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन डॉ. पांडे यांनी दिल्यानंतर दीड तासाचा हाय व्होल्टेज ड्रामा संपुष्टात आला. दुसरीकडे विद्यापीठ विकास मंचचे डॉ. गोविंद काळे, स्वाभिमानी मुप्टाचे डॉ. शंकर अंभोरे आदींनी प्रभारींना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले, तसेच हा निर्णय मागे घेतल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे प्रशासन कात्रीत सापडले आहे. एरवी एखाद्या मुद्यावर तांत्रिक पेच निर्माण झाल्यास अन्य विद्यापीठांतील प्रक्रियेचे अवलोकन करून निर्णय घेतला जात असे. तथापि, या मुद्यावर अन्य विद्यापीठांनी वेगवेगळे निर्णय घेतले असल्यामुळे प्रशासनाची द्विधा मनःस्थिती झाली आहे. 

व्यवस्थापन परिषदेची निवडणूक 15 जून रोजी होणार आहे. प्रशासनाने प्रभारी अधिष्ठाता आणि अधिकार्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली. उत्कर्ष पॅनलच्या सदस्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दोन दिवसांपूर्वी याबाबत तक्रार करून नावे वगळण्याची मागणी केली. तथापि, दोन दिवसांत काहीही हालचाली न झाल्यामुळे उत्कर्षचे डॉ. राम चव्हाण, डॉ. राजेश करपे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. भारत खैरनार, डॉ. फुलचंद सलामपुरे, प्रा. संभाजी वाघमारे, प्रा. सुनील मगरे यांनी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या दालनात धाव घेतली. प्रभारींची नावे वगळेपर्यंत आम्ही दालनातून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

कुलसचिव डॉ. पांडे यांना बोलविण्यात आले. कुलगुरू येथे नाहीत. ते आल्यानंतर निर्णय घेऊ असे त्या म्हणाल्या. मात्र, सदस्य ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. कुलगुरूंना दूरध्वनी करून आताच निर्णय घ्या, असे ते म्हणाले. प्र-कुलगुरू आणि कुलसचिवांनी कुलगुरूंना वारंवार दूरध्वनी केला. मात्र, त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. डॉ. तेजनकर यांनी प्रशासनाची अडचण समजावून सांगत सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.