Sat, Mar 23, 2019 18:07होमपेज › Aurangabad › भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून द्या

भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून द्या

Published On: Jul 14 2018 1:17AM | Last Updated: Jul 14 2018 1:17AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

जालना रोड आणि बीड बायपास महामार्ग हे 30 मीटरऐवजी थेट 60 मीटरचे करण्यात यावे, तसेच रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना आपण मराठवाडा विकास मंडळाच्या बैठकीत केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.13) मंडळाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर नंदकुमार घोडेले, मंडळाचे सचिव दीपक मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे.

त्याकरिता ही बैठक घेण्यात आल्याचे डॉ. कराड यांंनी सांगितले. नगरनाका ते केंब्रिज स्कूल हा जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही रस्ते हे दोन्ही रस्ते 60 मीटरचे करण्यात यावे, अशी सूचना महापौर घोडेले यांनी केली. रुंदीकरणासाठी भूसंपादनाची जबाबदारी देण्यात आल्याने मनपाने एफएसआय, टीडीआर देण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु मालमत्ता धारकांनी रोख स्वरूपात मोबदला मागितल्यास मनपाची आर्थिक स्थिती नाही. यापूर्वी नागपूर, सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाने शहरातील रस्त्यांसाठी भूसंपादनाकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या धर्तीवर मनपाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना महापौरांनी केली.

पडेगाव-मिटमिटा रस्ता

नगरनाका ते पडेगाव-मिटमिटा या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल, असे महापौरांनी निदर्शनास आणून दिले. त्याप्रमाणे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची तयारी अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.

रस्त्यांवर मार्किंग करावे

शहरातून जाणार्‍या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ करते. मात्र, या रस्त्यांकडे लक्ष दिले जात नाही. या रस्त्यांवर मनपाने लेन मार्किंग करून द्यावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडून केली जाते, परंतु या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते विकास महामंडळाने लेन मार्किंग करून द्यावे, अशी सूचना केल्याचे महापौरांनी सांगितले.

नोडल अधिकारी म्हणून पानझडे यांची नियुक्‍ती

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाचे शहरात एकूण पाच रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्या-त्या विभागांशी संपर्क ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून शहर अभियंता सखाराम पानझडे यांची नियुक्‍ती करण्याची सूचना महापौर घोडेले यांनी आयुक्‍त डॉ. विनायक यांना केली आहे.