Tue, Jul 23, 2019 11:24होमपेज › Aurangabad › एसटीने अडवला मनपाचा कचरा

एसटीने अडवला मनपाचा कचरा

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 04 2018 1:07AMऔरंगाबाद : प्रतिनिधी
शहागंज येथील मोकळ्या जागेत मनपा प्रशासन कचरा टाकत होती, तर परिसरातील नागरिक अवैधपणे आपली वाहने त्या ठिकाणी पार्क करत होती. एसटी महामंडळाने प्रत्येकाला विनंतीपूर्वक समजावून सांगितले, परंतु मनपासह परिसरातील नागरिक ऐकायला तयार नसल्याचे पाहून एसटी महामंडळाने चक्कगेटसमोरूनच मोठी नाली खोदल्यामुळे मनपासह परिसरातील नागरिक चक्रावले आहेत. आता त्यांना बसस्थानकात प्रवेश करायलाच जागा नाही. एसटी महामंडळाने लढवलेली शक्कल चांगलीच परिणामकारक ठरली आहे. सध्या बसस्थानक  एकदम मोकळे झाले आहे. 
शहागंज येथील बसस्थानकाला वाली नसल्यामुळे परिसरातील वाहनधारक दिवसभरासह रात्रभर या ठिकाणी विविध वाहने उभी करत होते. जुने बसस्थानक एक पार्किंग पॉइंटच झाला होता. त्याचबरोबर अनेक हातगाडीवालेही बसस्थानकासमोरच आपले बस्तान मांडून दिवसभर व्यवसाय करत होते. हे कमी होते की काय शहरात कचर्‍याचा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर मनपा प्रशासनाने कचर्‍याच्या गाड्या या ठिकाणी आणून रिचवल्या. मनपा प्रशासनाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत एसटी महामंडळाने तो कचरा उचलावा असे पत्र दिले होते, परंतु मनपा प्रशासनाने एसटी महामंडळाच्या या पत्राला काही उत्तर दिले नाही. शेवटी वैतागलेल्या एसटी महामंडळाने नवीन शक्कल लढवण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच शहागंज येथील बसस्थानकात प्रवेश करायच्या ठिकाणी मोठी नाली खोदून ठेवली. ही नाली ओलांडून कोणतेही वाहन आत जाऊ शकणार नाही याची काळजी घेण्यात आली. एसटी महामंडळाच्या या पवित्र्याने मनपा प्रशासनासह परिसरातील वाहनधारकांची चांगलीच कोंडी झाली आहे. आता एकाही वाहनधारकाला आत प्रवेश करता येणार नाही.