Wed, Jul 17, 2019 12:20



होमपेज › Aurangabad › वीजबिल थकबाकीविरुद्ध महावितरणचा एल्गार

वीजबिल थकबाकीविरुद्ध महावितरणचा एल्गार

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 1:39AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

सद्यःस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे संपूर्ण थकबाकी शून्य करण्याच्या ध्येयानेच काम करणे आवश्यक आहे. थकबाकी असल्यास वीजपुरवठा खंडितच होणार, असा संदेश या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना द्यावा, असे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सुमारे हजारो अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, प्रभारी महाव्यवस्थापक विवले लक्ष्मीकांत राजेल्ली, महाव्यवस्थापक सत्यजित राजेशिर्के, अधीक्षक अभियंता संजय आकोडे, उदयपाल गाणार, दिनेश अग्रवाल, रतन सोनुले, कैलास हुमणे, सहायक महाव्यवस्थाक रेखा भाले, शिल्पा काबरा, उपमहाव्यवस्थापक जयप्रकाश सोनी, कार्यकारी अभियंते, अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे म्हणाले की, शून्य थकबाकी मोहीम पूर्ण आक्रमकपणे राबविल्या गेली पाहिजे व थकबाकी पूर्णपणे वसूल झाली पाहिजे. आर्थिक संकट दूर करण्यासाठी थकबाकीविरोधात लढा देण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी कर्तव्यनिष्ठेने थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले पाहिजे. एक तर थकीत वीजबिल ताबडतोब भरा, अन्यथा अंधारात राहा असा प्रत्ययच थकबाकीदारांना द्यावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक  संजय ताकसांडे यांनी केले.