Mon, Aug 19, 2019 13:20होमपेज › Aurangabad › ‘यूपीएससी’ला घरघर; बँकांतही आऊटसोर्सिंग

‘यूपीएससी’ला घरघर; बँकांतही आऊटसोर्सिंग

Published On: Feb 15 2018 8:48AM | Last Updated: Feb 15 2018 8:48AMऔरंगाबाद : संजय देशपांडे

बेरोजगारीच्या झळा देशभरातील तरुणाईला बसण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) यंदा विविध संवर्गातील अधिकार्‍यांच्या 782 पदांसाठी नागरी सेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात काढली आहे. दुसरीकडे विविध बँकांच्या 800 पेक्षा जास्त शाखा बंद करण्यात आल्या आहेत. बँकांतील बहुतांश कामांचे ‘आऊटसोर्सिंग’ करण्यात आल्याने नोकरभरती जवळपास ठप्प झाली आहे.

‘आयएएस’, ‘आयपीएस’ होण्याचे ध्येय बाळगून देशभरातील लाखो बेरोजगार ‘यूपीएससी’ची नागरी सेवा परीक्षा देत असतात. या परीक्षेतून विविध खात्यांतील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या 1,200 ते 1,400 जागा दरवर्षी भरल्या जातात. यंदा मात्र अवघ्या 782 पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. ‘यूपीएससी’च्या जागा घटल्याने रोजगारनिर्मितीचा प्रश्‍न आगामी काळात गंभीर होऊ शकतो, असा इशारा सेवानिवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी दिला आहे.

भरती बंदमुळे ताण वाढला
सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू अशा कारणांमुळे बँकांमधील हजारो पदे दरवर्षी रिक्‍त होत असतात. रिक्‍त होणारी ही पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जनधन योजना, शिष्यवृत्ती, गॅस सबसिडीसाठी बँक खाती बंधनकारक करण्यात आल्याने कार्यरत कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. देशभरातील बँकांत सध्या कर्मचारी, अधिकार्‍यांची लाखो पदे रिक्‍त आहेत. याशिवाय शिपाई, सफाई कामगारांची पदे भरलीच जात नाहीत. सुरक्षा रक्षकांची भरती केली जात नसल्याने लाखो ‘एटीएम’ची सुरक्षा वार्‍यावर आहे. विरळ लोकवस्ती असणार्‍या भागांत महिला व मुली एकट्याने पैसे काढू शकत नाहीत, असे विदारक चित्र असल्याचे अ.भा.बँक कर्मचारी संघटनेचे सहसचिव देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले.


सक्‍तीची सेवानिवृत्ती
स्टेट बँक ऑफ हैदराबादसह अनेक बँकांचे भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आल्याने देशभरातील 800 शाखा बंद करण्यात आल्या. तेथील कर्मचार्‍यांना सक्‍तीची सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचा आरोपही तुळजापूरकर यांनी केला.  बँकांची बहुतांश कामे आऊटसोर्सिंग केली जात असल्याचा फायदा दलाल उठवित असल्याची टीकाही त्यांनी केली.

आऊटसोर्सिंगमुळे जनतेच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. बँकांची विश्‍वासार्हताही संपुष्टात येत आहे. आऊटसोर्सिंगची कामे बंद करून नव्याने नोकर भरती करणे हा त्यावर उपाय आहे.
- देवीदास तुळजापूरकर, सहसचिव अ.भा. बँक कर्मचारी संघटना