Sun, Mar 24, 2019 11:03होमपेज › Aurangabad › तीन मिनिटांच्या भाषणात राणे, भाजप लक्ष्य

तीन मिनिटांच्या भाषणात राणे, भाजप लक्ष्य

Published On: Feb 14 2018 2:50AM | Last Updated: Feb 14 2018 2:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

टी.व्ही.सेंटर येथील सत्कार समारंभात शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या तीन मिनिटांच्या भाषणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भाजपवर जोरदार टीका केली. केवळ धार्मिकताच पाहत नाही, तर लोकांची कामे करतो, त्यांचे प्रश्‍न सोडवतो, म्हणून निवडून येतो, असेही खैरे म्हणाले. 

शिवसेना मध्य विभागाच्या वतीने टी.व्ही.सेेंटर चौकात मंगळवारी खा. खैरे आणि युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सहा वाजेच्या या कार्यक्रमास खैरे यांनी रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी हजेरी लावली. दहा वाजता कार्यक्रम संपविणे बंधनकारक होते. त्यामुळे घाईघाईतच खंजिरीवाद सत्यपाल महाराज यांच्या हस्ते खैरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर घाईघाईतच त्यांनी अवघ्या तीन मिनिटांत आपले भाषण उरकले. व्यासपीठावर सेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेेले, उपजिल्हा प्रमुख अनिल पोलकर आदींची उपस्थिती होती. 

राणे यांनी रविवारी सिडको एन-7 येथे झालेल्या सभेत खैरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला खैरे यांनी उत्तर दिले. काल एक नेते शहरात येऊन माझ्याविषयी उलटसुलट बोलून गेले. त्यांना इथे येऊन बघा म्हणावे, कशी गर्दी आहे. तुमच्या सभेसारख्या रिकाम्या खुर्च्या नाहीत. खैरे कसे निवडून येतात याचे आश्‍चर्य वाटते असे ते म्हणाले. पण मी नुसती धार्मिकता पाळतो असे नाही, लोकांची कामे करतो, विकास करतो, लोकसभेत लोकांचे प्रश्‍न मांडतो, म्हणून लोक मला निवडून देतात, असेही खैरे म्हणाले. 
खैरे यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. मित्रपक्ष असूनही भाजपला शिवसेना डोळ्यांत खुपत होती. युती असूनही भाजपवाले सेनेला दाबण्याचा प्रयत्न करीत होते. सेनेचे काम करायचे नाही असे आदेश दिल्ली-मुंबईतून सुटत होते. फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीतही त्यांनी कोट्यवधी रुपये वाटले. 

या सर्व गोष्टींमुळेच सेनेने आता स्वबळावर लढायचे ठरविले आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सेनेला विसरू नका, मला विसरले तरी चालेल, असे आवाहनही खैरे यांनी उपस्थितांना केले.


प्रेमाच्या भानगडीत पडू नका : सत्यपाल महाराज
सत्काराआधी खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी सत्यपाल महाराज यांनी तरुण-तरुणींना उद्देशून प्रेमाच्या भानगडीत पडू नका, आधी करिअर करा, असे आवाहन केले. 

प्रेम करायचेच असेल तर जोतिबा-सावित्रीबाईंसारखे करा, असेही ते म्हणाले. दारू पिणार्‍यांचाही त्यांनी समाचार घेतला.