Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Aurangabad › ...तोपर्यंत काही करु शकत नाही : राज ठाकरे

...तोपर्यंत काही करु शकत नाही : राज ठाकरे

Published On: Jul 19 2018 12:03PM | Last Updated: Jul 19 2018 12:02PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. सध्या शहरातील कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. तो सोडवायचा असेल तर नाशिक पॅटर्न बघा. जेव्हा आमच्या हातात सत्ता होती तेव्हा तिथ केलेले नियोजन बघितल्यानंतर तुम्हाला समजेल असे राज ठाकरे म्हणाले. तसेच  हा दौरा पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी किती विल्हेवाट लावली हे जनतेसमोर आणणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक सर्वांचे योग्य नियोजन करून खत निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती केली जाते. नाशिकला कचऱ्याचे जे नियोजन आहे ते औरंगाबाद सोडा मुंबईला पण नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

निवडणुकांबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा इव्हीएमवरुन भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ईव्हीएम मशीन मधे घोळ आहेत. उमेदवारांना शून्य मते कशी काय पडू शकतात. इव्हीएममध्येच घोळ असून भाजप अशाच प्रकारे निवडणूक लढवते. 

राज्यातील अनेक प्रश्न मनेसेने उचलून धरले आहेत. त्यासाठी रस्त्यावर आंदोलनही केले. पण माझ्या हातात सत्ता नाही. ती येईपर्यंत मी काही करु शकत नाही. ज्यावेळी ब्लु प्रिंट तयार नव्हती तेव्हा प्रश्न विचारत होतात पण आज राज्याची ब्लु प्रिंट कोणी वाचली का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

आगामी निवडणुकीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 2019 ला बरेच बदल होतील. येणाऱ्या निवडणुकीत सेना-भाजपची सत्ता येणार नाही हे नक्की आहे. त्यासाठी वेगळी रणनिती आखणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. आज  महाराष्ट्रात जातीवाद वाढत चालला आहे. एकत्र जेवणारे आता बाजूला जात आहेत. १०-१५ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आता प्रत्येक गोष्ट आरक्षणावर येते. असेच सुरु राहीले तर त्यांचा पराभव निश्चित असल्याचे राज ठाकरे म्हणाले.