होमपेज › Aurangabad › मनपा वीस मालमत्ता ठेवणार गहाण

मनपा वीस मालमत्ता ठेवणार गहाण

Published On: Feb 07 2018 1:33AM | Last Updated: Feb 07 2018 1:18AMऔरंगाबाद :प्रतिनिधी

 भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराचे पैसे देण्यासाठी 98 कोटी 31 लाख रुपयांचे कर्ज काढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केलेला आहे. आता या कर्जासाठी मनपाच्या कोणकोणत्या मालमत्ता गहाण ठेवता येतील याची प्रशासनाने सादर केली आहे. या यादीत मनपाच्या वीस मालमत्तांचा समावेश आहे. 

कर्ज काढण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. मागील सभेत कर्ज काढण्याच्या प्रस्तावास भाजप, एमआयएमने तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावास विरोध करण्यात शिवसेनेचे सदस्यही मागे नव्हते. माजी महापौर त्र्यंबक तुपे, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, आत्माराम पवार आदींनीही प्रस्तावाला विरोध केला होता. मनपावर अगोदरच कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे आता नवीन कर्ज काढू नका, अशी भूमिका या नगरसेवकांनी मांडली होती. योजना पूर्ण झाली पाहिजे, यात दुमत नाही, पण त्यासाठी कर्ज काढू नये, मनपाच्या बजेटमध्येच त्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी या सदस्यांनी केली होती. शिवसेना नेत्यांनी मात्र कर्जाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे महापौरांना आदेश दिले होते. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या महापौरांनी मागील सभेत या प्रस्तावावर निर्णय न घेता ही सभा तहकूब केली होती. त्यानंतर महापौरांनी या कर्जासाठी कोणकोणत्या इमारती गहाण ठेवता येतील याची यादी सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने मंगळवारी 20 मालमत्तांची यादी सादर केली आहे.