होमपेज › Aurangabad › आधी वाटले गाडीचे टायर फुटले, कळले तेव्हा...

आधी वाटले गाडीचे टायर फुटले, कळले तेव्हा...

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 24 2018 12:22AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अचानक आवाज झाला. वाटले गाडीचे टायर फुटले. मात्र, तो ग्रेनेडहल्ला होता. आमच्या दोन गाड्यांचे टायर फुटले तर पोलिस व्हॅनला छर्रे लागून छिद्रे पडली. पोलिसांनी न थांबता गाड्या वेगाने शहराबाहेर काढल्या. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो, अशा शब्दांत मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी काश्मिरात त्यांच्यावर कोसळलेल्या संकटाची माहिती दिली. आठ तास उलटल्यानंतरही घटनेची दहशत कायम असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.  

आ. काळे आणि राज्यातील अन्य चार आमदार कुटुंबासह जम्मू आणि काश्मीरच्या दौर्‍यावर गेले आहेत. त्यांचा ताफा बिजबिहारा शहरातून जात असताना अतिरेक्यांनी ताफ्याजवळील सुरक्षा चौकीला लक्ष्य करून ग्रेनेडहल्ला केला. या हल्ल्यात एका मुलासह दहा जण जखमी झाले आहेत. या घटनाक्रमाबाबत दै. पुढारीने आ. काळे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले, ईश्‍वराची कृपा. हल्ल्याचा घटनाक्रम सांगताना ते म्हणाले ः आमचा ताफा बिजबिहारा शहरातून जात होता. अनंतनाग जिल्ह्यातील हे तालुक्याचे ठिकाण पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख दिवंगत मुफ्ती मोहंमद सईद यांचे मूळ गाव आहे. रस्त्यावर लोकांची गर्दी असल्यामुळे आमचा ताफा हळूहळू जात होता. दुपारी साडेबाराच्या आसपासची वेळ होती. अचानक आवाज झाला.

आम्हाला वाटले टायर फुटले असेल, परंतु लोकांची पळापळ सुरू झाल्यामुळे काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव झाली आणि आमचा थरकाप उडाला. आमच्या ताफ्यात पाच गाड्या होत्या. पुढे एक आणि मागे एक अशा दोन पोलिस व्हॅन होत्या. घटनेनंतर पोलिसांनी शिताफीने कुठेही न थांबता आमचा ताफा शहराबाहेर काढला. आम्ही दोन कि.मी.चे अंतर अक्षरशः जीव मुठीत धरून पार केले. शहराबाहेर आल्यानंतरच थोडे थांबू शकलो. गाडीतून उतरल्यानंतर गाड्यांची अवस्था पाहून पायाखालची जमीनच सरकली. दोन गाड्यांचे टायर फुटले होते, तर पोलिसांच्या एका गाडीवर रायफलीच्या गोळ्या लागल्यानंतर पडतात तशी छिद्रे पडलेली होती.

आपण मोठ्या हल्ल्यातून वाचलो असल्याचे लक्षात आले. मनोमन ईश्‍वराची करुणा भाकली. मराठवाड्यातील शिक्षक आणि जनतेचेप्रेम आणि आशीर्वादामुळेच आपण या संकटातून बचावलो, असे आ. विक्रम काळे यांनी दै. पुढारीला सांगितले. 

पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेगाने ताफा पुढे नेल्यामुळे संकट टळले. रस्त्यांवरील अपघातांप्रमाणे काश्मिरात हल्ले ही सामान्य बाब आहे. आम्ही ज्या शहरातून जात होतो तेथे दर 500 फुटांवर लष्करी जवान तैनात होते. रस्त्यांवर लोकांची गर्दीही भरपूर होती. त्यामुळे हल्ला होईल, असे वाटत नव्हते. अगदी ग्रेनेडचा स्फोट झाल्यानंतरही आम्ही टायर पंक्‍चर झाले असावे असे समजत होतो. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचल्यानंतर आम्हाला तो ग्रेनेड हल्ला होता हे कळले. 

केवळ दैव बलवत्तर होते म्हणून आम्ही बचावलो, असेही आ. काळे यांनी सांगितले. घटनेचे वृत्त धडकल्यानंतर आ. काळे यांचा मोबाईल सतत खणखणू लागला. लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शिक्षक, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांनी आ. काळे यांना क्षेमकुशल विचारून त्यांना धीर दिला, असे मुख्याध्यापक एस. पी. जवळकर यांनी सांगितले.