Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Aurangabad › लोकसभेसाठी एमआयएमही तयारीत

लोकसभेसाठी एमआयएमही तयारीत

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:50AMऔरंगाबाद : सुनील कच्छवे

महाराष्ट्रात राजकारणात नवीनच असलेल्या एमआयएमनेदेखील औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, परंतु प्रत्यक्ष रिंगणात उतरायचे की नाही याचा निर्णय ऐनवेळी सर्व स्रोत आणि साधनांचा विचार करूनच घेण्यात येणार असल्याचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीला अजून सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. तरीही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आत्तापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उतरण्याची घोषणा शांतिगिरी महाराज यांनी नुकतीच केली. भाजपने उमेदवारी दिल्यास भाजपच्या तिकिटावर किंवा मग अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, असे त्यांनी म्हटले आहे. त्यातच आता एमआयएमनेही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात नवीन असलेल्या एमआयएमने मागील विधानसभा निवडणुकीत औरंगाबादेतील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. त्यात तिरंगी लढतीत मध्य मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले. पूर्व मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार गफ्फार कादरी हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले. पश्‍चिम मतदारसंघातही एमआयएम पुरस्कृत उमेदवाराला जवळपास 35 हजार मते मिळाली. त्यानंतरच्या महानगरपालिका निवडणुकीतही एमआयएमला घवघवीत यश मिळाले. संपूर्ण शहरातून एमआयएमचे तब्बल 26 नगरसेवक निवडून आले. या सर्व गोष्टींमुळे आता एमआयएमने लोकसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. आमदार जलील यांनी सांगितले की, लोकसभेची तयारी सुरू आहे, परंतु प्रत्यक्ष रिंगणात उतरण्याबाबतचा निर्णय ऐनवेळीच ठरेल. पक्षाकडील साधने आणि स्रोतांचा विचार करून हा निर्णय घेतला जाईल.

...तर चौरंगी लढत
एमआयएम पक्ष लोकसभेच्या आखाड्यात उतरल्यास औरंगाबादेत चौरंगी लढत होऊ शकते. शिवसेना आणि भाजपने यावेळी लोकसभा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे उमेदवार मैदानात असतील. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाल्यास त्यांचा एक किंवा आघाडी न झाल्यास दोघांचे दोन उमेदवार रिंगणात राहतील. त्यात पुन्हा एमआयएमचा उमेदवार उभा राहिल्यास निवडणुकीच्या आखाड्यात चार ते पाच उमेदवार राहतील, असा अंदाज आहे. 

लोकसभेसाठी उमेदवार कोण ?
लोकसभेसाठी एमआयएमकडे उमेदवार आहे का या प्रश्‍नावर आमदार जलील म्हणाले, तीन वर्षांपूर्वी औरंगाबादेत विधानसभेला मी उमेदवार असेल असे कोणाला तरी वाटले होते काय, परंतु पक्षाने मला संधी दिली आणि मी निवडून आलो. लोकसभेलाही पक्षाकडे उमेदवारांची कमी नाही. पक्ष कुणालाही संधी देऊ शकतो.

पुण्याचा प्रश्‍नच नाही, मी ‘मध्य‘मधूनच लढवणार
आमदार जलील हे पुढील निवडणूक पुण्यातून लढणार असल्याची चर्चा आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले, माझ्यापुढे सध्या असा कोणताही पर्याय नाही. कदाचित मला बाहेर घालविण्यासाठी हे षड्यंत्र असू शकते. मी औरंगाबाद ‘मध्य‘मधूनच पुढची विधानसभा निवडणूक लढवणार आहे.