Thu, May 23, 2019 14:30
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › दंगलीच्या गुन्ह्यातही मतीनचे नाव

दंगलीच्या गुन्ह्यातही मतीनचे नाव

Published On: Aug 20 2018 1:35AM | Last Updated: Aug 20 2018 1:30AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी रात्री सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. रविवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, त्याला मनपाबाहेर केलेल्या वाहनांच्या तोडफोड प्रकरणात सोमवारी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच, 11 व 12 मे रोजी जुन्या औरंगाबादेत झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यातही त्याचे नाव समोर आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्याचा कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला म्हणून आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मतीनविरुद्ध उपमहापौर विजय औताडे यांच्या फिर्यादीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याला भाजप नगरसेवकांनी मनपा सभागृहाताच बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी मनपाबाहेर दगडफेककरीत वाहनांची तोडफोड केली होती. शुक्रवारी हा राडा झाला. त्यानंतर जुन्या शहरात तणाव निर्माण झाला होता. 
या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्याने घेऊन तत्काळ तीन गुन्हे दाखल केले. तसेच, उपद्रवी नगरसेवक मतीनला अटक केली होती. एका गुन्ह्यात त्याला रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी त्याला सिटी चौक पोलिस दुसर्‍या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची शक्यता असून त्यानंतर त्याची दंगलीच्या गुन्ह्यातही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.