Thu, Apr 25, 2019 12:14होमपेज › Aurangabad › कोर्टाचे आदेश ‘तोडले’

कोर्टाचे आदेश ‘तोडले’

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 12:42AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सलीम अली सरोवराचे पर्यटनस्थळ करण्याचा घाट घालत महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून तलावाचे सुशोभीकरण केले. मात्र, यावर पक्षीमित्रांनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत सलीम अली सरोवर सर्वांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून हे सरोवर बंद केलेले आहे. खंडपीठाच्या या निर्णयाला एमआयएमने मंगळवारी (दि.1) थेट कृतीतूनच आव्हान दिले. 

एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह या सरोवराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत हे सरोवर खुले करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी या कार्यकर्त्यांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हडको परिसरात असलेले सलीम अली सरोवर हे एकमेव पाणथळीचा तलाव म्हणून ओळखले जाते. येथे 132 पक्ष्यांचे तसेच अनेक कीटकांचे आश्रयस्थान आहे. अशा या जैवविविधता जोपासणार्‍या तलावाला पिक्निक स्पॉट करण्यासाठी चार वर्षांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेने तयारी केली. ही जैवविविधता नष्ट  करण्याचा प्रयत्न करीत येथे दोन कोटी रुपये खर्च करून मनपाने विविध विकास कामे केली.

या कामांमुळे जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगत सलीम अली तलाव संवर्धन समितीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यानंतर खंडपीठाने सलीम अली सरोवर पुढील आदेश येईपर्यंत खुले करू नये, असे आदेश मनपाला दिलेले होते. शिवाय या सरोवराच्या रक्षणाची जबाबदारीही मनपाकडे देण्यात आली होती. खंडपीठाच्या या आदेशामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हे सरोवर बंद अवस्थेत पडून आहे. तेथे कुणालाही प्रवेश नाही. 

एमआयएमची स्टंटबाजी

खंडपीठाच्या आदेशाने बंद असलेल्या या सरोवराच्या दुरुस्तीसाठी औरंगाबाद महापालिकेने नागरिकांच्या खिशातील दोन कोटी रुपयांचा चुराडा केला आहे. या उद्यानावर शहरवासीयांचा हक्‍क आहे. त्यामुळे हे उद्यान सर्वांसाठी खुले झालेच पाहिजे, असे म्हणत एमआयएमने मंगळवारी न्यायालयाच्या आदेशाला डावलून ते खुले करणार असल्याचे जाहीर केले होते. जाहीर केल्यानुसार एमआयएमचे नगरसेवक तथा गटनेते नासेर सिद्दीकी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह दुपारी सरोवरावर दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत या सरोवराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश करीत बराच वेळ घोषणाबाजी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.