Mon, May 27, 2019 09:43होमपेज › Aurangabad › प्रेयसीचा गर्भपात करून दुसरीसोबत घरोबा

प्रेयसीचा गर्भपात करून दुसरीसोबत घरोबा

Published On: May 09 2018 1:57AM | Last Updated: May 09 2018 1:57AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ट्रॅव्हल्समधून पुण्याला जाताना ओळख झाली. याच ओळखीतून प्रेम फुलले. पुढे ते पती-पत्नीसारखे राहिले. यातून ‘ती’ गर्भवती झाली. पण, ‘त्याने’ बळजबरी ‘तिचा’ गर्भपात केला आणि लग्नाला नकार देऊन दुसरीसोबतच घरोबा केला. हा प्रकार लक्षात आल्यावर सोमवारी (दि. 7) प्रेयसीने सिडको पोलिसांत धाव घेऊन
फसवणूक आणि बळजबरी गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

विनय गोकूळ ढाके (28, रा. जळगाव. ह.मु. एन-5, सिडको) असे आरोपीचे नाव असून पूर्वी तो ट्रॅव्हल्स एजंट होता. आता त्याने स्वतःचे दुकान सुरू केले आहे. तर पीडितेचे शिक्षण सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, 12 ऑगस्ट 2013 रोजी 21 वर्षांची असताना पीडिता खासगी कामानिमित्त पुण्याला गेली होती. जाताना तिची ट्रॅव्हल्समध्ये आरोपी विनयसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने माघारी परतण्यासाठीही ट्रॅव्हल्स उपलब्ध असल्याचे सांगून मोबाइलवर संपर्क साधण्यासाठी म्हणून तिला मोबाइल क्रमांक दिला. त्यामुळे पुढे ते सतत एकमेकांच्या संपर्कात राहिले.

मैत्रिणींसोबत सहलीवर जाण्यासाठीही तिने आरोपीकडूनच ट्रॅव्हल्स बुक केली होती. त्यात विनय हासुद्धा सहलीवर गेला होता. या वाढलेल्या ओळखीतून त्यांच्यात प्रेम फुलले. यात विनयने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली. दरम्यान, विनयने बळजबरी तिचा गर्भपात केला आणि तिला लग्नाला नकार दिला. तसेच, त्याने दुसरे लग्नही केले. ही माहिती समजताच पीडितेने सिडको ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या प्रकरणी बळजबरी गर्भपात, फसवणूक आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सी. व्ही. ठुबे करीत आहेत. 

आरोपीचे पलायन

26 वर्षीय पीडिता आणि आरोपी विनय ढाके यांचे प्रकरण काही दिवस महिला तक्रार निवारण केंद्रात सुरू होते. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे ठरल्यावर आरोपीने पलायन केले. दरम्यान, आरोपीने आतापर्यंत पीडितेकडून लाखो रुपये उकळल्याचीही माहिती हाती आली आहे. आता गुन्हा नोंद झाला, मात्र आरोपीने धूम
ठोकली आहे. त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags : aurngabad, Lover