Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Aurangabad › आधी मशीन लावा, मगच कचरा टाका

आधी मशीन लावा, मगच कचरा टाका

Published On: Jul 06 2018 1:30AM | Last Updated: Jul 06 2018 1:27AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत. शहरातील कचरा चिकलठाणा येथील जागेत आणून टाकण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. परिसरातील नागरिकांनी बुधवारी रात्री कचरा घेऊन आलेल्या मनपाच्या गाड्या परत पाठविल्या. त्यानंतर गुरुवारी दुपारी महापौरांसह पालिकेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आधी प्रक्रिया करणार्‍या मशीन आणून बसवा आणि मगच कचर्‍याच्या गाड्या घेऊन या असे म्हणत या नागरिकांनी कचरा टाकण्यास तीव्र विरोध दर्शविला. 

नारेगावचा जुना कचरा डेपो बंद झाल्यामुळे शहरात साडेचार महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपाने कचरा साठविण्यासाठी हर्सूल, चिकलठाणा, कांचनवाडी आणि पडेगाव या ठिकाणी चार नवीन जागा निवडल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून या ठिकाणी कचरा नेऊन टाकण्यात येत आहे, परंतु बुधवारी रात्री चिकलठाणा परिसरातील नागरिकांनी चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेत कचरा टाकण्यास विरोध दर्शविला. तसेच या नागरिकांनी कचरा घेऊन आलेल्या गाड्या परत पाठविल्या. मनपा नुकताच इथे कचरा आणून टाकत आहे.

त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे, त्यामुळे आता कचरा टाकू देणार नाही, असे येथील नागरिकांनी स्पष्ट केले. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी दुपारी चिकलठाणा येथील जागेवर जाऊन नागरिकांची भेट घेतली. त्यांच्यासोबत शहर अभियंता सखाराम पानझडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील आदी अधिकारीही होते. प्रक्रिया प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, इतके दिवस सहकार्य केले तसे आणखी काही दिवस करा, असे म्हणत महापौरांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्‍त नागरिक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले.

आधी तुम्ही प्रक्रिया करणार्‍या मशीन आणून बसवा आणि त्यानंतरच कचरा आणा, आता आम्ही ऐकणार नाही. गाड्या आणल्याच तर आम्ही गाड्यांसमोर झोपू असा इशाराही या नागरिकांनी दिला. यावेळी महापौरांनी रोगराई पसरू नये म्हणून कचर्‍याच्या ढिगांवर फवारणी करण्याचे, तसेच पसिरात कुत्रे पकडणारी गाडी पाठविण्याचे आदेश मनपाच्या अधिकार्‍यांना दिले. त्यानंतरही नागरिकांनी कचरा टाकण्यास आमचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. शेवटी महापौरांनी पुन्हा एकदा सहकार्य करण्याचे आवाहन करत तेथून काढता पाय घेतला.  यावेळी माजी नगरसेवक संजय चौधरी, बाळासाहेब दहिहंडे, दिगंबर कावडे, नीलेश कावडे, संतोष रिठे, कचरू कावडे, संजय गोटे, नारायण गव्हाणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.