Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Aurangabad › कर्जाच्या आमिषाने गंडविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

कर्जाच्या आमिषाने गंडविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

Published On: May 27 2018 1:17AM | Last Updated: May 27 2018 12:29AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अवघ्या एक टक्‍का व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडोजणांना गंडा घालणार्‍या टोळीचा ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुष्पेंद्र कुमार प्रेम (32, रा. तुगाना, जि. बागपत, उत्तर प्रदेश) असे या म्होरक्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कैलास काशिनाथ जाधव (रा. लोणी खुर्द, ता. वैजापूर) यांना शेतात शेड उभारण्यासाठी पैशांची गरज होती. एका स्थानिक वृत्तपत्रात फ्युजन फायनान्स या कंपनीची कर्जविषयक जाहिरात त्यांच्या वाचनात आली. एक टक्‍का व्याजाने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असे या जाहिरातीत म्हटले होते, तसेच संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांकही दिले होते.

40 हजार गमावले

जाधव यांनी कर्ज देणार्‍या कंपनीशी संपर्क साधला. भामट्यांनी त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकेचे स्टेटमेंट, फोटो आदी कागदपत्रे ई-मेलद्वारे मागवून घेतली. कागदपत्रे प्राप्त होताच कंपनीने जाधव यांना फोन करून तुम्हाला 4 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी 6,200 रुपये प्रक्रिया शुल्क म्हणून लागतील, असे सांगितले. त्यानंतर विविध कारणे सांगून जाधव यांच्याकडून 40,200 रुपयांचा भरणा करून घेतला. 

बरेच दिवस झाल्यानंतरही कर्ज न मिळाल्याने जाधव यांनी पुन्हा कंपनीकडे संपर्क साधला असता, कर्जाच्या रकमेबरोबरच तुम्हाला लकी ड्रॉमध्ये मोटारसायकल मिळणार असून, त्यासाठी 35 हजार रुपये भरण्याची मागणी केली. आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगून जाधव यांनी मंजूर झालेल्या कर्जाची रक्‍कम देण्याची कंपनीकडे मागणी केली. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असता, कंपनीने दूरध्वनी क्रमांक बंद करून टाकले.