Wed, Jul 17, 2019 11:58



होमपेज › Aurangabad › मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यास मदत मिळणार : वनविभागावर ठपका

बिबट्याचे प्रकरण विधिमंडळात

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 23 2017 1:46AM

बुकमार्क करा





सोयगाव : प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील कवली, बहुलखेडा परिसरात दहशत माजविणार्‍या नरभक्षक बिबट्याचे प्रकरण विधिमंडळात पोहोचले. हिवाळी अधिवेशनात आ. अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्‍न लावून धरला. वनमंत्री गिरीश महाजन यांनी या हल्ल्यात बळी पडलेल्या शेतकर्‍यास मदत केली जाईल असे सांगितले मुख्यमंत्र्यांनीही यास तत्वत: मान्यता दिली.

पोलिस प्रशासन व वनविभागाच्या वादात कवली येथील शेतकर्‍याचा रामपूरवाडीच्या जंगलात फडशा पडल्याच्या संशयितघटनेबाबतचा पेच सुटण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.

रामपूरवाडीच्या जंगलात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना 14 डिसेंबररोजी घडली होती, तसेच  घटनास्थळी मृत शेतकर्‍याचा उजवा पाय आढळून आला होता, मात्र वनिवभाग यास दुजोरा देण्यास तयार नव्हता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासचक्रे फिरवून घातपाताची कोणतीही शक्यता नसल्याचा अहवाल दिला होता. यामुळे वनविभागाच्या जबाबदारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

आ. सत्तार यांनी घटनास्थळी पाहणी करून मयत शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. गुरुवारी (दि.21) वनविभागाचे उपवनसरंक्षक वडसकर व पोलिस निरीक्षक सुजित बडे या अधिकार्‍यांना हिवाळी अधिवेशनात बोलावून सत्यता काय याबाबत विचारणा करण्यात आली.

उपवनसंरक्षक वडसकर यांनी बिबट्याच्या हल्ल्याचा संशय असल्याचा सुधारीत अहवाल पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे सादर केला, यांनतर सत्तार यांनी मदतीची मागणी सभागृहात लावून धरली होती. वनमंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात निवेदन करून चाळीसगाव तालुक्यातील घटनेप्रमाणे सोयगाव तालुक्यातील घटनेत मृत शेतकर्‍याच्या कुटुंबीयाला पात्र धरण्यात येईल असे सांगीतले.

दरम्यान जि. प. सदस्य पुष्पा काळे यांनीही मृत शेतकर्‍याच्या कुटुंबीयाला भेट देऊन वनमंत्र्यांना घटनेचा अहवाल दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीतून जि. प. सदस्य पुष्पा काळे यांनी या कुटुंबीयांना मदतीची मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे रंगनाथ काळे यांनीही या प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कानावर हा प्रकार घातला होता. अखेरीस वनिवभागाने बिबट्याच्या हल्ल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याचा अहवाल सभागृहात दिल्याने मयत शेतकर्‍याच्या कुटुंबीयास शासकीय मदत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात  शेतकर्‍याचा मृत्यू  झाला नसल्याचा प्राथमिक अहवाल देऊन सोयगावचे वनपरिक्षेत्रअधिकारी शिवाजी काळे यांनी हातवार केले होते. चुकीचा अहवाल सादर केल्याबद्दल त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी सभागृहात लावून धरणार आहे - आ. अब्दुल सत्तार