Wed, Aug 21, 2019 14:45होमपेज › Aurangabad › धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

Published On: Jul 10 2018 1:29AM | Last Updated: Jul 10 2018 1:29AMकन्नड : प्रतिनिधी

तालुक्यातील भांबरवाडी परिसरात धुमाकूळ घालून अनेक जनावरांची शिकार करून गावकर्‍यांच्या मनात धडकी भरविणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाच्या पथकाला अखेर सोमवारी पहाटे यश आले. या बिबट्यावर डाटगनव्दारे फायर करून बेशुद्ध करण्यात आले. यामुळे तो पकडला गेला.

दरम्यान, बिबट्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानमध्ये दाखल करण्यात आले आहे.  भांबरवाडी येथील शेतकरी किसन चव्हाण यांच्या शेतातील  गोठ्यात सोमवारी पहाटे या बिबट्याने प्रवेश करून एका वासराची शिकार केली. त्यानंतर इतर गायींवर हल्‍ला करण्याच्या तयारीत असताना एका गायीने त्याच्यावर पायाने प्रतिहल्ला केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. यात बिबट्या जखमी झाला, दरम्यान या घटनेची माहिती चव्हाण यांनी तत्काळ वन्यजीव विभागास दिल्यानंतर विभगीय वन अधिकारी आर. आर. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन्यजीव रक्षक  आर.  ए. नागापूरकर यांच्यासह कर्मचार्‍यांचे पथक सकाळी आठ वाजता घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या हा जखमी झाल्याने तो उपळा शिवारातील वनविभागाच्या खोर्‍यात थांबला होता. येथे गुरगुरण्याचा आवाज आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी ताबडतोप डाटगनव्दारे बिबट्यावर फायर करण्यात आले. काही वेळातच बिबट्या बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला पिंजर्‍यात जेरबंद करून  त्याच्यावर कन्नड येथील लघु चिकित्सालयाचे सहायक आयुक्‍त  डॉ. एस. व्ही. चौधर यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानामध्ये पाठविण्यात आले.