Tue, Jul 23, 2019 07:13होमपेज › Aurangabad › जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून 

जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून 

Published On: Dec 30 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 1:27AM

बुकमार्क करा
औरंगाबाद ः प्रतिनिधी

‘तुम्ही आम्हाला जमीन वाटून का देत नाही’ असे म्हणून चौघांनी झोपेतच 70 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही खळबळजनक घटना राजनगर, मुकुंदवाडीत घडली. या प्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध मारहाण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

काशिनाथ हरिभाऊ वाघमारे (70, रा. एरंडे वडगाव, जि. जालना) असे मृताचे नाव असून या प्रकरणी परमेश्‍वर दोंडगे, त्याची बहीण संजीवनी दोंडगे, मेहुणा हरिभाऊ शिंदे आणि संतू हरिभाऊ शिंदे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. विशेष म्हणजे, संजीवनी ही औरंगाबाद डेपोत कंडक्टर (वाहक) म्हणून कार्यरत असून ती पंधरा-वीस वर्षांपूर्वी फिर्यादी ज्ञानेश्‍वर काशिनाथ वाघमारे याची पत्नी म्हणून राहत होती. मात्र, नंतर ते वेगळे राहू लागले आहेत, असे पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर, त्याचे वडील काशिनाथ वाघमारे आणि त्याची बहीण हे तिघे 27 डिसेंबर रोजी नाशिकहून तपोवन एक्स्प्रेसने जालना येथे गेले. तेथे बहिणीला सोडून ज्ञानेश्‍वर व काशिनाथ हे दोघे बसने औरंगाबादेत आले. ते मुकुंदवाडीत घरी गेले. जेवण करून रात्री झोपले. त्यानंतर रात्री ज्ञानेश्‍वरचा साडू हरिभाऊ शिंदे हा तेथे आला. त्याने जमिनीच्या वाटणीवरून काशिनाथ यांच्याशी वाद घातला. शिवीगाळ करून त्यांना दगडाने मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच परमेश्‍वर दोंडगे, संजीवनी दोंडगे आणि संतू हरिभाऊ शिंदे तेथे आले. त्यांनीही शिवीगाळ करून काशिनाथ वाघमारे यांना मारहाण केली. यात काशिनाथ हे जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

पोलिसांचा संशय मुलावरच

काशिनाथ वाघमारे यांच्या खुनाबाबत मुलगा ज्ञानेश्‍वर याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्याने जो घटनाक्रम सांगितला तो पोलिसांना संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे त्याचा पोलिसांनी जबाब नोंदविला, पण तो आपबिती वेगळी सांगत असल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस वेगवेगळ्या पातळीवर करीत आहेत.