Tue, Sep 17, 2019 22:32होमपेज › Aurangabad › प्रसूत महिला शिबीर स्थळावरून खासगी दवाखान्यात 

प्रसूत महिला शिबीर स्थळावरून खासगी दवाखान्यात 

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:46AM

बुकमार्क करा

सिल्लोड : अमोल नाईक  

कुटुंब कल्याण शस्रक्रिया झाल्यानंतर एका महिलेची प्रकृती अचानक खालावल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यासाठी पानवडोद (ता. सिल्‍लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळेला वैद्यकीय अधिकार्‍यासह एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे प्रसंगावधान साधून नातेवाइकांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार घेतले. त्यामुळे तिचे प्राण वाचले. एकंदरीत या रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभामुळे महिलेच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यासह कर्मचारी रुग्णांच्या जिवाशी कसे खेळतात, याचा प्रत्येय पुन्हा एकदा या घटनेवरून समोर आला आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (दि.15) कुटुंब कल्याण शस्रक्रिया शिबीर घेण्यात आले. जवळपास दहा महिलांच्या शस्रक्रिया या शिबिरात करण्यात आल्या. या महिलांसोबत उषाबाई नामदेव गव्हाणे (रा. बोदवड ता. सिल्लोड) यांची या शिबिरात कुटुंब कल्याण शस्रक्रिया झाली. शस्रक्रिया झाल्यानंतर किमान सात दिवस वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना या रुग्णांच्या प्रकृतीची रात्रंदिवस काळजी घेणे गरजेची असते. जेणे करून या रुग्णांची प्रकृती व्यवस्थित राहते, मात्र ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यात तसे होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रसंग उषाबाई या महिलेवर रविवारी ( दि.17) ओढवला. या महिलेला रात्रीच्यावेळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तसेच तिचा रक्‍तदाबही वाढल्याने नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांकडे धाव घेतली, मात्र रात्री रुग्णालयात कुणी हजर नव्हते. नाविलाजाने नातेवाइकांनी प्रसंगावधान साधून या महिलेस तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल करून उपचार घेतले. त्यामुळे तिचे प्राण वाचले, असेच म्हणावे लागेल. दरम्यान, दुसर्‍या दिवशी हा प्रकार समजल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी या रुग्णाच्या नातेवाइकांची माफी मागून यापुढे रुग्णाच्या उपचाराबाबत निष्काळजीपणा केला जाणार नाही, असे सांगून त्यांनी या रुग्णाला पुन्हा अ‍ॅडमिट करून घेतले.

माझ्या पत्नीची कुटुंब कल्याण शस्रक्रिया पानवडोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच दिवसांपूर्वी झाली होती, मात्र तिला श्वास घेण्यास रविवारी रात्रीच्या वेळी त्रास सुरू झाला. रक्‍तदाबही वाढला. यावेळी मात्र रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकार्‍यासह एक कर्मचारी हजर नव्हता. यामुळे आम्ही खासगी दवाखान्यात आमच्या रुग्णाला दाखल करून उपचार घेतले. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

नामदेव गव्हाणे, रुग्ण महिलेचा पती

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आम्हाला कुटुंब कल्याण शिबीर घेण्यास सांगतात, मात्र सुविधा देत नसल्याने अशा अडचणीला आम्हाला तोंड द्यावे लागते. या रुग्णालयात कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्‍त भार आहे, तसेच रविवारी माझी साप्‍ताहिक सुटी असल्याने मी रुग्णालयात नव्हतो. त्यामुळे हा प्रकार घडला. यापुढे असा प्रकार होणार नाही. रुग्णांची काळजी घेतली जाईल.

डॉ. एस.जी.चोपडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पानवडोद. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex