Sun, Mar 24, 2019 10:59होमपेज › Aurangabad › लच्छू पहेलवानला अखेर अटक

लच्छू पहेलवानला अखेर अटक

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दंगलीचा मास्टरमाइंड असा पहिल्या दिवसापासून आरोप होत असलेल्या लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहेलवान (47, रा. धावणी मोहल्ला) याला बुधवारी (दि. 16) रात्री अखेर विशेष तपास पथकाने अटक केली. शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचा विरोधी पक्षनेता फेरोज खान यांच्यानंतर लच्छू पहेलवान हा सर्वात मोठा आरोपी ठरला आहे. त्याच्यावर पानदरिबा भागात गैरकायद्याची मंडळी जमवून धारदार शस्त्र बाळगून मनसबदार जनरल स्टोअर्सला आग लावणे, तोडफोड करणे, तरुणांना भडकावणे असा ठपका ठेवला आहे. 

शुक्रवारी गांधीनगर-मोतीकारंजा भागात नळ कनेक्शन कापण्यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यानंतर मध्यरात्री राजाबाजार, शहागंज, जिन्सी, नवाबपुरा, चेलीपुरा परिसरात दंगल पेटली. यात जवळपास 75 दुकाने आणि घरे, 64 वाहने, अशी सव्वादहा कोटींची मालमत्ता भस्मसात झाली. शुक्रवारी रात्रीपासून या भागात आणखीही तणाव आहे. रहदारी सुरळीत झाली असली तरी बंदोबस्त पाचव्या दिवशीही कायम होता. दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक जोमाने कारवाई करीत आहे. दरम्यान, लच्छू पहेलवान याला अटक करण्याचे ठरल्यावर विशेष तपास पथकातील अधिकारी श्रीकांत नवले, हवालदार दादा झारगड, मनोज उईके, सचिन संपाळ, योगेश तळवंदे, विनोद खरात यांनी साडेनऊ वाजता धावणी मोहल्ला भागातून त्याला ताब्यात घेतले. सिटी चौक ठाण्यात आणून अटक केल्यानंतर घाटीत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एमआयएमचे नेते ओवेसी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लच्छू पहेलवान याला अटक करण्याची मागणी केली होती, हे विशेष. पहेलवान तयार करणारा लक्ष्मीनारायण बाखरिया लच्छू नावाचाच नव्हे तर खराखुरा पहेलवान आहे.

तालीम चालवून पहेलवान तयार करण्याचा त्याचा छंद आहे. विद्यार्थीदशेत मारहाण, दादागिरीमुळे जुन्या शहरात त्याचा चांगलाच दरारा होता. 18 वर्षांच्या एका तरुणाचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यातून तो निर्दोष सुटला आहे. त्याच्यासह मुलाने मनपा उपायुक्‍त आयुब खान यांच्या मुलालाही रस्त्यावर  मारहाण केली होती. तेव्हा तत्कालीन पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी त्याला चांगलाच दम भरला होता. याशिवाय लच्छू पहेलवान याच्याविरुद्ध मारहाण करण्याचे विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याची मुलगी राजाबाजार भागाची अपक्ष नगरसेविका आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

नेते, कार्यकर्त्यांची गर्दी

लच्छू पहेलवान याला अटक केल्याची माहिती समजताच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सिटी चौक ठाण्यासमोर गर्दी केली होती. नेत्यांनी ठाण्यात जाऊन त्याची भेट घेतली. तसेच, कार्यकर्त्यांनी बाहेर गर्दी केल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, लगेचच बंदोबस्त तैनात करून पोलिसांनी कार्यकर्त्यांना हाकलून दिले. त्यानंतर वातावरण निवळले होते.