होमपेज › Aurangabad › बॅगमध्ये राहिलेली काडतुसे शिवसेनेच्या नेत्याला महागात पडली

बॅगमध्ये राहिलेली काडतुसे शिवसेनेच्या नेत्याला महागात पडली

Published On: Jan 24 2018 10:08AM | Last Updated: Jan 24 2018 11:09AMऔरंगाबाद: प्रतिनिधी

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी मुंबईला जाण्यासाठी मंगळवारी भल्या पहाटे साडेपाच वाजता चिकलठाणा विमानतळावर आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांना बॅगमध्ये चुकून राहिलेली दोन काडतुसे (बुलेट्स) चांगलीच महागात पडली. विमानतळावरील तपासणीत त्यांच्या बॅगमध्ये काडतुसे आढळून आल्यानंतर सुरक्षा विभागाच्या चौकशीला सामोरे जाताना त्यांची एकच धावपळ झाली. शिवाय मुंबईचे विमानही हुकले. त्यामुळे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला डोणगावकर हजेरी लावू शकले नाहीत.

शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. कृष्णा पाटील डोणगावकर हे पहिल्यांदाच पक्षाच्या मोठ्या बैठकीला हजर राहणार होते. त्यासाठी त्यांनी पूर्वतयारीही केली होती. पहाटे साडेपाच वाजेच्या विमानाचे तिकीट काढून ठेवलेले होते. 

मुंबईला जाण्यासाठी ते पहाटे विमानतळावर पोहोचले. विमानतळ सुरक्षा विभागाच्या जवानांनी त्यांच्यासह बॅगची तपासणी केली असता, डोणगावकर यांच्या बॅगमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळली. त्यानंतर सुरक्षा विभागात एकच खळबळ उडाली. त्यांनी डोणगावकरांची कसून चौकशी सुरू केली. डोणगावकरांनीही शस्त्रपरवाना असल्याचे सांगत स्वतःची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानतळ सुरक्षा जवानांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. अखेर हे प्रकरण एमआयडीसी सिडको ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी डोणगावकरांचा शस्त्रपरवाना तपासला. तसेच, पिस्तूल घरी ठेवल्यानंतर अनवधानाने दोन काडतुसे बॅगेत राहिल्याचे डोणगावकर यांनी सांगितल्यानंतर त्यांना मुक्त केले, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. कारण; मुंबईचे विमान केव्हाच ढगात दिसेनासे झाले होते.

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणार्‍या कृष्णा डोणगावकर यांनी दीड वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी अ‍ॅड. देवयानी डोणगावकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्यांच्याबरोबर होत्या का, हे मात्र समजू शकले नाही.