Mon, May 27, 2019 07:02होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षणासाठी जयभवानीनगर ते क्रांती चौक अनवाणी दिंडी

मराठा आरक्षणासाठी जयभवानीनगर ते क्रांती चौक अनवाणी दिंडी

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 03 2018 1:15AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

अंगात पारंपरिक धोतर-बंडी, डोक्याला केशरी रुमाल, डोईवर न्याहरीचे गाठोडे आणि अंगावर ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं..’ असे लिहिलेला फलक, अशा पोषाखात अनवाणी पायांनी काढलेल्या दिंडीने गुरुवारी (दि. 2) शहरवासियांचे लक्ष वेधले. जयभवानी नगरातील रहिवासी प्रकाश हेंगडे यांनी जयभवानीनगर ते क्रांती चौक अशी दिंडी काढली. यात त्यांची पत्नी, भावजय, तसेच मित्रपरिवारही सहभागी झाला होता. मुलगा ओंकारने खांद्यावर शिवध्वज घेतला होता.

आपण समाजाचे देणे लागतो, ही जाण ठेवत प्रकाश हेंडगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अनवाणी दिंडी काढली होती. उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात, शिवाय रिक्षातून शाळेची मुले ने-आण करणे, अशा दैनंदिन कामात दिवस ढळून जातो. परिणामी, ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवणे शक्य होत नाही, याची सल हेंडगे यांच्या मनात होती. त्यामुळे जयभवानीनगर ते क्रांती चौक अशी अनवाणी दिंडी काढण्याचा निर्धार त्यांनी केला.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास सहकुटुंब त्यांनी जयभवानी नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून दिंडीस सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुंडलिक नगरातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून दिंडी क्रांती चौकात आली. शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास अभिवादन करून समारोप करण्यात आला. दिंडीत त्यांच्यासोबत संतोष काळे, नलावडे, मुकेश सोनवणे, अमोल जाधव, विशाल पवार, सुनील मराठे, सोमनाथ पवार, नीलेश ढवळे, कांताराव वाघ सहभागी झाले होते.

आंदोलकांना न्याहारी

प्रकाश यांच्या पत्नी छाया आणि भावजाय भाग्यश्री यांनी आंदोलकांसाठी पिठलं-भाकरीची न्याहारी बनवली होती. प्रकाश यांनी स्वतः डोक्यावरून क्रांती चौकापर्यंत ती आणली. येथे आल्यावर हेंगडे कुटुंबीयांनी ठिय्या देत असलेल्या आंदोलकांना जेवण दिले.