औरंगाबाद : प्रतिनिधी
कट का मारला, म्हणून तिघांनी वरूड फाट्याजवळ 9 मे रोजी चाकूने भोसकून दुचाकीस्वार नंदू लक्ष्मण दांडगे (35, रा. वरूड काझी) यांचा खून केला होता. घटनास्थळावर कोणतेही धागेदोरे नसताना चिकलठाणा पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तिघांच्या मुसक्या आवळल्या. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने तपास करून दहा दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.
गणेश सीताराम ढगे (23, रा. महालपिंप्री), कल्याण तात्याराव पळसकर (27) आणि अमोल तात्याराव पळसकर (23, दोघे रा. पळशी) अशी आरोपींची नावे आहेत. ढगे हा मजूर असून, अन्य दोघेही शेतकरी आहेत. त्यांना बुधवारी (दि. 23) अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींविरुद्ध मोटारसायकल चोरीचे गुन्हे नोंद आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, 9 मे रोजी मध्यरात्री 12 ते 12.30 वाजेच्या सुमारास नंदू दांडगे हे लग्न समारंभ आटोपून दुचाकीने वरूड काझी येथे जात होते. त्याच वेळी आरोपींनी त्यांना गाठून कट का मारला, असे विचारत त्यांच्यावर चाकूहल्ला केला होता. त्यांच्या पाठीत चाकू खुपसला होता. यात गंभीर जखमी झालेल्या दांडगे यांच्यावर घाटीत उपचार सुरू असताना 14 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिकलठाणा ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळावर काहीच धागेदोरे हाती न लागल्यामुळे पोलिसांच्या अडचणी वाढल्या होत्या. कारण, आरोपींचे ना नाव होते, ना दुचाकी क्रमांक. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही कोणीच नव्हते. परिसरातील सर्व ढाबे, हॉटेल्सवर विचारपूस करण्यात आली. सीसीटीव्ही तपासले मात्र, कोणताही सुगावा मिळाला नव्हता.
रेकॉर्डवरचे 40 आरोपी तपासले : खुनाचा गुन्हा असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत यांच्यासह त्यांचे पथक आणि चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले, उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, सहायक फौजदार जी. व्ही. देशमुख आदींच्या पथकाने आरोपींची शोधमोहीम सुरू केली. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी कोणत्याही परिस्थितीत आरोपी अटक झाले पाहिजेत, असे बजावल्यामुळे पोलिसांनी आठ दिवसांत रेकॉर्डवरील 40 आरोपींना पकडले. त्यांच्याकडे विचारपूस केली. त्याचवेळी दुसर्या बाजूला मोबाइल लोकेशन ट्रेस करून संशयितांची धरपकड सुरू होती.