होमपेज › Aurangabad › गतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली

गतिमंद भावाची किडनी देण्याची याचिका फेटाळली

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 22 2017 1:23AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची किडनी देण्याची परवानगी मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी आज फेटाळली. 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील येथील डॉ. अतुल पवार या यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. त्यांच्या एका भावाची किडनी डॉ. अतुलशी जुळते. म्हणून पवार कुटुंब औरंगाबादला बजाज रुग्णालयात आले. मात्र, डॉ. अतुलचा तो भाऊ गतिमंद असल्यामुळे रुग्णालयातील अवयवदानविषयक समितीने गतिमंद दात्याचे अवयवदान करण्यास ह्यूमन ऑर्गन अ‍ॅन्ड टिश्यूज ट्रान्सप्लान्ट कायदा 1994 च्या कलम 9 (1) नुसार प्रतिबंध असल्याचे कारण दर्शवून त्या दात्याची पुढील वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. यामुळे डॉ. अतुलचे वडील गणपतराव संभाजीराव पवार यांनी अ‍ॅड. प्रभाकर के. जोशी यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली.

दोन्ही किडन्या निकामी झालेल्या भावाला किडनीदान करण्याचा निर्णय किडनीदाता गतिमंद भाऊ स्वत: घेण्यास सक्षम आहे का, याच्या परिणामांची त्याला जाणीव आहे का, या बाबींची मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विनय बार्‍हाळे यांच्यामार्फत तपासणी करण्यात यावी. त्यांचे त्या बाबतचे मत 14 डिसेंबरपर्यंत खंडपीठात दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. त्यानुसार तपासणी केली असता डॉक्टरांनी तो दाता सक्षम नसल्याचा अहवाल दिला होता. त्याला न्यायमूर्तींच्या दालनात हजर केले असता त्याच्याशी संवाद साधल्यानंतर तो सक्षम नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले.

यानंतर याचिका निकालासाठी राखून ठेवण्यात आली होती. त्यावर आज वरीलप्रमाणे आदेश देण्यात आले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रभाकर के. जोशी, अ‍ॅड. अरविंद आर. जोशी आणि अ‍ॅड. व्ही. पी. गोलेवार, कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे अ‍ॅड. लहरीमनोहर डी. वकील, तर शासनातर्फे सरकारी वकील स्वप्निल जोशी आणि सोनपेठकर यांनी काम पाहिले.