होमपेज › Aurangabad › डोंगरकाप्यांचा धुमाकूळ

डोंगरकाप्यांचा धुमाकूळ

Published On: Feb 09 2018 2:17AM | Last Updated: Feb 09 2018 2:07AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहर परिसरात खदानी व क्रशरचालकांनी हैदोस घातला असून, त्यांना मुरूममाफियांचेही सहकार्य मिळत आहे. शहरालगतचे डोंगर, टेकड्या नेस्तनाबूत करण्याचा विडाच या डोंगरकाप्यांनी उचलला आहे. केवळ महसूल प्रशासनातील अधिकार्‍यांच्या खाबुगिरीमुळे निसर्गाचा र्‍हास होत आहे. तिसगावचा खवड्या डोंगर, गोलवाडीच्या डोंगराची अक्षरशः वाट लावली आहे. पुढच्या बाजूने सुस्थितीत दिसणारे हे डोंगर मागील बाजूंनी पूर्णतः पोखरले आहेत. 

औरंगाबाद शहर व परिसरात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. घरे, अपार्टमेंटची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यासाठी लागणारी वाळू, खडी, मुरूम आदींची मागणीही वाढलेली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी विनापरवानगी क्रशर, खदानी चालवण्याचा सपाटाच सुरू आहे. महसूलमधील अधिकार्‍यांना हाताशी धरून सर्रासपणे डोंगर फोडले जात आहेत. प्रत्येक गावात महसूलमधील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आदी अधिकारी असतात, मात्र त्यांच्याकडून डोंगरकाप्यांच्या हालचालींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नैसर्गिक संपत्ती लोप पावत चालली आहे. विशेष म्हणजे दिवसा ढवळ्या या संपत्तीवर डल्ला मारला जात आहे. 

एका परवानगीवर 4-4 क्रशर सुरू
खदान, क्रशर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागते. परिसरातील एक जण ही परवानगी घेऊन रीतसर धंदा सुरू करतो. त्याच्या परवानगीच्या आधारे इतर काही जण विनापरवानगीच धंदा सुरू करतात. एका परवानगीवर 4-4 क्रशर, खदानी सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. वाळूमाफियांकडूनही रॉयल्टी वाचवण्यासाठी एका पावतीवर 2-3 ट्रिपा मारल्या जातात.     हाच फंडा आता क्रशर, खदानचालकांकडून अवलंबला जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले केवळ 28 ठिकाणीच परवाने : आजघडीला औरंगाबाद जिल्ह्यात जागोजागी मोठ्या प्रमाणात डोंगर कापण्याचा ‘उद्योग’ सुरू आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी कार्यालयातून केवळ 28 ठिकाणीच परवाने देण्यात आलेले आहेत. त्यात पैठण तालुक्यातील आडगाव जा., बाभुळगाव येथे प्रत्येकी एकाला, बिडकीन येथे चौघांना, तर  चित्तेगाव येथे पाच जणांना अधिकृत परवाने देण्यात आले आहेत. फुलंब्री तालुक्यात फुलंब्री, धानोरा व खामगाव येथे प्रत्येकी एकाला, वैजापूर तालुक्यात खंडाळा येथे आठ जणांना, गंगापूर तालुक्यात मांजरी आणि वाहेगाव येथे प्रत्येकी एकाला व औरंगाबाद तालुक्यात गांधेली आणि चौका येथे प्रत्येकी एकाला अशा एकूण 28 जणांना परवाने देण्यात आले आहेत. हे परवाने पाच वर्षांसाठी असतात. 

अळीमिळी-गुपचिळी...
जिल्ह्यातील 28 खदानींना परवानग्या दिल्या आहेत. पाच वर्षांसाठी या खदानी चालवण्याची परवानगी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. औरंगाबाद तालुक्यातील गांधेली आणि चौका या दोनच खदानी शहरालगतच्या आहेत. तर तहसीलदारांना तात्पुरत्या परवानग्या देण्याचे अधिकार आहेत. मात्र तहसीलदारांनी किती जणांना व किती दिवस-महिन्यांसाठी खदान, क्रशरची परवानगी दिली, याचा अहवालच जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला जात नाही. जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकार्‍यांनाही हा अहवाल मागवण्याचे धाडस होत नाही. 
मुरूम, दगड काढण्यासाठी या ठिकाणची परवानगी दिली होती का, परवानगी दिली असेल तरी कोणाला दिली, किती ब्रास उत्खननाची परवानगी दिली, याचा सविस्तर अहवाल तहसीलदारांकडून मागवण्यात येईल. त्यात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई केली जाईल. 

- पी. एल. सोरमारे, अपर जिल्हाधिकारी.


तात्पुरत्या परवानाच्या नावाखाली बेसुमार कापाकापी
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनाही तात्पुरते परवाने देण्याचा अधिकार आहे. या तात्पुरत्या परवानाधारकाला जास्तीत जास्त दोन हजार ब्रास उपसा करता येतो. शिवाय त्याचा कालावधीही महिना, दोन महिन्यांचा असतो. मात्र,  या तात्पुरत्या परवान्याच्या नावाखालीच अधिकार्‍यांना हाताशी धरून जिल्ह्यात खदान व मुरमाची बेसुमार लूट सुरू आहे. लाखो ब्रासचा अख्खा डोंगर, टेकड्या तात्पुरत्या परवान्याच्या नावाखाली गायब केल्या जात आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात किती जणांना तात्पुरते परवाने दिले आहेत, याची माहितीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध नाही. तसे पाहिले तर औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल सावंगी परिसरात झाल्टा, आडूळ, सातारा, देवळाई परिसरातील डोंगर, बीड रोडवरील पाचोड, आडूळ परिसर, गंगापुरातील शेंदुरवादा परिसर, शहरालगतच्या गोलवाडी, तिसगाव परिसरासह वैजापूर, सिल्लोड, कन्नडसह सर्व तालुक्यांमध्ये असा बेसुमार उपसा सुरू आहे.