Wed, Jul 17, 2019 10:43होमपेज › Aurangabad › टायर फुटून कार ट्रकवर धडकली

टायर फुटून कार ट्रकवर धडकली

Published On: Jan 15 2018 2:09AM | Last Updated: Jan 15 2018 1:55AM

बुकमार्क करा
करमाड : प्रतिनिधी

टायर अचानक फुटल्याने भरधाव कार दुभाजकावरून विरुद्ध दिशेला जाऊन ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. हा अपघात करमाड रस्त्यावरील पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री झाला. बॉबी शिवाजीराव राऊत (वय 22) व गोविंद लक्ष्मीनारायण दायमा (वय 24, रा. जालना) अशी मृत तरुणांची नावे आहेत, तर निखिल ओमप्रकाश सेठे (वय 25) हा जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम बंगालमधील मलदा येथील ट्रकचालक हा शनिवारी अहमदनगर येथून आपल्या ट्रक क्रमांक डब्ल्यूबी 33 सी 0729 मध्ये कांदा भरून बंगालकडे घेऊन जात होता. हा ट्रक औरंगाबाद-जालना रोडवरील करमाड रस्त्यावरून जात असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास रामजी हॉटेलसमोर असलेल्या पुलाजवळ अचानक जालन्याकडून औरंगाबादकडे जात असलेल्या कार क्रमांक एमएच 06 एबी 2214 चे टायर फुटले.

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती चक्‍क दुभाजकावरून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जात समोरून येणार्‍या ट्रकवर आदळली. त्यामुळे कारमधील बॉबी राऊत, गोविंद दायमा व निखिल सेठे हे तिघे तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन जखमींना नागरिकांच्या मदतीने घाटी रुग्णालयात आणले. मात्र गंभीर जखमी झालेल्या बॉबी व गोविंद या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

जखमी निखिलवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक बी. पी. कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे हे तपास करत आहेत. कार ट्रकखाली फसली  कारचे टायर फुटल्याने ती वेगात जाऊन ट्रकखाली अडकली होती. त्यामुळे कार पूर्णपणे चेपल्याने तिन्ही तरुण आत फसले होते. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने तिला बाजूला काढून तिचा पत्रा कापून तिन्ही तरुणांना बाहेर काढले.