Fri, Dec 13, 2019 19:38होमपेज › Aurangabad › बिबट्याच्या पिलांना भेटली आई

बिबट्याच्या पिलांना भेटली आई

Published On: Dec 13 2017 7:54PM | Last Updated: Dec 13 2017 8:02PM

बुकमार्क करा

कन्नड ः प्रतिनिधी

तालुक्यातील आलापूर शिवारात ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना मंगळवारी 3 बिबट्याची पिले आढळून आली होती. ही पिले वन विभागाने आहे त्याच ठिकाणी ठेवली होती. बुधवारी सकाळी ही पिले जागेवर नव्हती. पिलांना घेऊन आई निघून गेली असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. मात्र, आई-मुलांची गळाभेट झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे वन विभागाकडे नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

आलापूर शिवारातील गट क्र. 48 मध्ये उसाची तोडणी सुरू होती. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ऊसतोड कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. काही वेळातच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या पिलांना आई भेटावी, तसेच पिले हरवल्याने बिबट हिंसक होऊ नये यासाठी वन विभागाने ही पिले सापडलेल्या ठिकाणीच ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर वन अधिकारी रात्रभर पिलांवर लक्ष ठेवून होते. यानंतर बुधवारी सकाळी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता, ही पिले त्यांना दिसून आली नाही.
आई आपल्या पिलांना सोबत घेऊन निघून गेली असल्याचा दावा वन विभागाने केला. मात्र, आई- लांची गळाभेट झाल्याचा कोणताही पुरावा वन  विभागाकडे नसल्याचे सूत्रांकडून कळते. दरम्यान बिबट मादी आपल्या पिलांना घेऊन निघून गेली असून शेतकर्‍यांनी घाबरू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे, लहानू घुगे, आर. व्ही. शिंदे, एम.आर.
घोरसाळे, एन.के. घोडके व वन मजुरांनी घटनास्थळी थांबून पहारा दिला.

आलापूर शिवारात उसाच्या शेतात तीन बिबट्यांची पिले सापडली होती. त्यांना त्याच ठिकाणी ठेवून आम्ही पहारा दिला. बुधवारी सकाळी त्या जागेवर पिले नव्हती. दिवसा पिलांची आई दुसरीकडे लपून बसली होती. रात्र होताच ती पिलांना इतरत्र सुरक्षित स्थळी घेऊनच जाते. यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. उसाचे शेत असल्याने पायांचे ठसे मिळाले नाहीत. शिवाय ट्रॅप कॅमेरा लावण्यात आलेला नव्हता.

-अनिल राहणे, वनपरिक्षेत्र अधिकारी

कायगाव (ता. गंगापूर) शिवारात लावला पिंजरा

गंगापूर ः तालुक्यातीलकायगाव शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरातील सोमनाथ गोविंद गायकवाड यांच्या वस्तीजवळ पिंजरा लावला आहे. बिबट्याचे दररोज दर्शन घडत असल्याची माहिती शेतकर्‍यांनी वन विभागाला दिली होती. वनविभागाचे सहायक वन संरक्षक प्रशांत वरुडे, नियतक्षेत्र अधिकारी वरझडी, डी. यू. गाडगीळ, सरपंच यांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना बिबट दिसून आला होता. यानंतर बुधवारी दुपारच्या सुमारास पिंजरा लावण्यात आला. प्रशासनाने बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.