Wed, Feb 20, 2019 16:49होमपेज › Aurangabad › कायगाव पुलाला काकासाहेब शिंदे यांचे नाव

कायगाव पुलाला काकासाहेब शिंदे यांचे नाव

Published On: Aug 02 2018 1:57AM | Last Updated: Aug 02 2018 12:53AMगंगापूर : प्रतिनिधी  

मराठाला समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कायगाव पुलावरून गोदावरी नदीत उडी मारत बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी बुधवारी कायगाव येथील रामेश्‍वर मंदिर परिसरात शांततेत संपन्न झाला. दरम्यान या पुलाचे मराठा मोर्चाकडून हुतात्मा स्व. काकासाहेब शिंदे सेतू असे नामकरण करण्यात आले असून या फलकाचे अनावरण शिंदे यांच्या आईच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान सकाळी सात ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कायगाव पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काकासाहेब शिंदे या तरुण आंदोलकाने 23 जुलै रोजी गोदावरी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. शिंदे यांचा दशक्रिया विधी येथील रामेश्‍वर मंदिर परिसरात करण्यात आला. यावेळी संजीव भोर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, खुलताबाद काँग्रेसचे जगन्नाथ खोसरे, बाजार समितीचे सभापती संजय जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक शिरसाट, शिवसेनेचे नगरसेवक भाग्येश गंगवाल, मच्छिंद्र देवकर आदी उपस्थित होते, दरम्यान गोदावरी नदी किनार्‍यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  

पुणे मार्गाने येणारी वाहने शेवगावमार्गे तर औरंगाबादकडून जाणारी वाहने पैठणमार्गे वळवण्यात आली होती. दशक्रिया विधी संपताच वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी गोदावरीच्या पात्रात बोटींसह पोहणार्‍यांचे पथकही तैनात करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक सावंत व राज्य दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर यांनी अगरकानडगाव येथे जाऊन काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांनी भेट घेऊन सांत्वन केले.