होमपेज › Aurangabad › अमेरिका राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात सिल्लोड येथे मूक मोर्चा

अमेरिका राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात सिल्लोड येथे मूक मोर्चा

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 23 2017 2:02AM

बुकमार्क करा

सिल्लोड : प्रतिनिधी 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्राईलची राजधानी म्हणून जेरूशलमची घोषणा केल्याच्या निषेधार्थ जमिअत ए उलेमा हिंदच्या वतीने शुक्रवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.

दुपारी तीन वाजता शहरातील जामा मशिद येथून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या वेळी डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबादचे फलक हातात घेऊन मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आला. बिलालनगर छत्तीस एकर येथे मोर्चाचा समारोप करून त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी हाफिज इलियास यांनी कुराण ए पाकचे पठण केले, तर युवकांनी सादर केलेली ‘मैं फलिस्तीन हूँ’ या कवितेने उपस्थितांच्या डोळ्यांच्या अश्रूंचा बांध फोडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाफिज नजीर यांची प्रमुख उपास्थिती होती.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना हाफिज आरीफ मौलाना म्हणाले, इस्लाम हा शांती व अहिंसेचा धर्म आहे. मात्र काही विघातक शक्‍तींनी इस्लाम धर्माला बदनाम करण्यासाठी कुरापती सुरू केल्या असून याचाच एक भाग म्हणून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्राईलची राजधानी म्हणून जेरूशलमची घोषणा केली आहे. मात्र जोपर्यंत आमच्या शरीरात रक्‍ताचा थेंब शिल्लक राहील, तोपर्यंत आम्ही इस्लामच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्‍त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुफ़्ती अजहर अहेमद यांनी व्यक्‍त केले. यावेळी हाफिज मोहमद सादिख, हाफिज शेख नवाब, नसीम अहमद, इरफान खान, हाफिज शेख उमर, डॉ. शकील खान, डॉ. फेरोज पठाण, देशमुख गुलाम हुसेन, आजम पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती.

शिस्तीत हातात तिरंगा घेऊन चालणार्‍या युवकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले

यावेळी मोर्चाच्या समोर हातात भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा हातात घेऊन युवकांनी शस्तीत पुढे चालताना उपस्थितांचे लक्ष वेधले तर दहशत गर्दी के मिज़ाइल अमरिका और इसराइल, जमीअत उलमा का नारा है, अलकुदुस हमारा है, जब तक जिस्म में जान है मस्जिदे अक्सा पे कुर्बान है, यरोशलम हमारा है, मुर्दाबाद मुर्दाबाद डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबादचे मोर्चेकर्‍यांच्या हातात असलेले फलक लक्ष वेधून घेत होते.