Fri, Feb 22, 2019 07:51होमपेज › Aurangabad › पैठणमध्ये कैद्यांसाठी सुरू केली रसवंती

पैठणमध्ये कैद्यांसाठी सुरू केली रसवंती

Published On: Dec 17 2017 2:12AM | Last Updated: Dec 17 2017 1:12AM

बुकमार्क करा

पैठण ः गौतम बनकर

नागरिकांना कैद्यांविषयी आपुलकी निर्माण व्हावी, त्यांच्यासह येथील खुल्या कारागृहाला उत्पन्न मिळावे या उद्देशाने जिल्हा खुले कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांच्या कल्पनेतून रसवंतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रसासोबतच चुलीवरचा चहा आणि मिसळ पाव या विक्री केंद्रावर ग्राहकांना मिळत आहे. शनिवारी कारागृह उप महानिरीक्षक राजेंद्र धामने यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन
करण्यात आले.

शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील पैठणशेवगाव या रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या केंद्रावर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले 12 कैदी कामावर आहेत. त्यांना प्रतिदिवस 60 रु. रोजगार दिला जातो. हे केंद्र दोन शिफ्टमध्ये सुरू असून प्रत्येक शिफ्टला 6 कैदी काम करतात. ज्या हाताने गुन्हेगारी कृत्य घडले, आयुष्याची राखरांगोळी झाली, त्याच हाताने उसाचा रस गाळण्याचे काम हे कैदी करत आहेत. या केंद्रावर उसाच्या रसाचा गोडवा आणि चुलीवरील चहा व मिसळ पाव खाण्याचा आनंद ग्राहक घेत आहे. विशेष म्हणजे ज्या लाकडी चरख्या पासून उसाचा रस काढला जात आहे.

सध्या या कारागृहात जन्मठेप झालेले 255 कैदी शिक्षा भोगत आहे. कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, चंद्रकांत अलसटवार, कारागृह अधीक्षक सचिन साळवे, तुरुंग अधिकारी, कारागृह स्वच्छता व आरोग्य समितीचे आशासकीय सदस्य चंद्रकांत तारू, बाळासाहेब जाधव, सीताराम भोकरे, बिभीषण तुतारे, बाबासाहेब गटकळ उपस्थित होते.

चरखा कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी गंगाधर पांचाळ (रा. बिलोली, जि.नांदेड) यांनी तयार केला आहे. ग्राहकांना दहा रुपयांत एक ग्लास रस, तर वीस रुपयांना चुलीवरची खमंग मिसळ मिळत आहे. कारागृहाच्या मालकीच्या शेतात कैद्यांनी ऊस उभा केला असून या उसापासून रसवंतीचा हा अभिनव उपक्रम कारागृहाने राबविला आहे. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी हाताने गाळलेला उसाचा रस ग्राहकांनाही चवदार लागत आहे, तेही याचे स्वागत करत आहेत.