Thu, Aug 22, 2019 11:21होमपेज › Aurangabad › म्हणे... ‘नालायक लोकांना बोलण्यासाठी सभागृह मिळाले’!

म्हणे... ‘नालायक लोकांना बोलण्यासाठी सभागृह मिळाले’!

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:20AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘नालायक लोकांना बोलण्यासाठी सभागृह मिळाले, ते तत्त्वज्ञानी बनून आरोप करतात, यालाच लोकशाही म्हणतात’ असे वादग्रस्त मत मनपातील शाखा अभियंता जयंत खरवडकर यांनी सोमवारी फेसबुकवर व्यक्त करीत मनपातील लोकप्रतिनिधींवर थेट शाब्दिक हल्ला केला. त्यांची फेसबुकवरील ही पोस्ट लोकप्रतिनिधींना चांगलीच झोंबली आणि त्यानंतर मनपातील वातावरण तापले. फेसबुकवर पोस्ट टाकून खरवडकर यांनी संपूर्ण सभागृहाचा अवमान केला, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सेना-भाजपच्या अनेक नगरसेवकांनी महापौरांकडे केली. तसेच या नगरसेवकांनी सायंकाळी उशिरा मनपा आयुक्तांचीही भेट घेतली. 

दमडी महल येथील अतिक्रमण हटावच्या कारवाईवरून सेना-भाजपच्या काही नगरसेवकांनी मागील सर्वसाधारण सभेत खरवडकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच इतरही काही मुद्दे उपस्थित करीत खरवडकरांवर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर खरवडकर यांनी सोमवारी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट केली. त्यात त्यांनी ‘नालायक लोकांना बोलण्यासाठी सभागृह मिळालं की ते तत्त्वज्ञानी बनून बेछूट आरोप करतात’, असे म्हटले होते. या पोस्टची माहिती मिळताच सेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ, विकास जैन, राजू वैद्य, आत्माराम पवार, गजानन मनगटे, तसेच भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे, उपमहापौर विजय औताडे आदींनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. खरवडकरांनी संपूर्ण सभागृहाचा अवमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ही     मागणी घेऊन हे नगरसेवक सायंकाळी मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनाही भेटले. गुरुवारपर्यंत खरवडकर यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्या दिवशीच्या सभेत फक्त नि फक्त यावरच चर्चा होईल, असा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे. 

आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सोमवारी रात्री उशिरा खरवडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. फेसबुकवरील आपली पोस्ट ही बेजबाबदार आणि बेशिस्तीची आहे. या पोस्टमुळे आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 चे नियम 3 चा भंग केल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

खरवडकर यांनी सर्वोच्च सभागृहाबद्दल बोलून खाल्ल्या मिठाला जागत नाही असे स्पष्ट केले आहे. आम्ही या प्रकरणात आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ते योग्य ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. 

- नंदकुमार घोडेले, महापौर
सभागृहात जनतेच्या प्रश्‍नावर बोललेल्या नगरसेवकांना ते नालायक ठरवत आहेत. उलट त्यांनीच सुपारी घेऊन लोकांची घरे पाडली, उच्च न्यायालयात पॅनलवर नसलेले वकील उभे करून दिशाभूल केली. आयुक्तांनी त्यांना या संदर्भात नोटीस काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. कारवाई न झाल्यास आम्ही सभेत बघू.      - राजेंद्र जंजाळ, नगरसेवक