Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Aurangabad ›  आजे सासूच्या अस्थी विसर्जनासाठी जाणार्‍या जवानावर काळाचा घाला

 आजे सासूच्या अस्थी विसर्जनासाठी जाणार्‍या जवानावर काळाचा घाला

Published On: Dec 02 2017 2:05AM | Last Updated: Dec 02 2017 1:49AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

आजे सासूच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या एसआरपीएफ जवानासह एक वर्षाच्या चिमुरडीवर काळाने घाला घातला. त्यांच्या दुचाकीला भरधाव डिझेल टँकरने उडविले. यात जवानासह चिमुकली जागीच ठार झाली. तर जवानाची मेहुणी गंभीर जखमी आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता जालना रोडवरील केंब्रिज चौकात ही घटना घडली. किशोर दादासाहेब थोटे  (वय 27, रा. थेरगाव, ता. पैठण) व गायत्री राजू दहिहंडे (वय 1, रा. दहिहंडे गल्ली, चिकलठाणा) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. 

अपघातात गंभीर जखमी झालेल्या कावेरी राजू दहिहंडे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर थोटे यांच्या आजे सासूचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे त्यांनी रजा घेतली होती. शुक्रवारी करमाडजवळ आडगाव खुर्द येथे राख सावडण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे ते आपल्या दुचाकीने (एमएच 20 डीडब्ल्यू 7128) आडगावला जात होते.

त्यांच्यासोबत याच दुचाकीवर मेहुणी कावेरी व तिची मुलगी गायत्री होती. सकाळी आठ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-जालना रस्त्यावरील केंब्रिज चौकात झाल्टा फाट्याकडून येणार्‍या डिझेल टँकरचा (एमएच 04 डीयू 7021)  चालक जालन्याकडे वळण घेत होता. मात्र त्याचे नियंत्रण सुटल्याने टँकर सरळ दुचाकीवर धडकवला. या अपघातात किशोर यांच्यासह गायत्री व कावेरी गंभीर जखमी झाले. नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

मात्र घाटीत डॉक्टरांनी किशोर व गायत्री यांना तपासून मृत घोषित केले. तर कावेरी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात डिझेल टँकरचालक नीलेश साहेबराव वडगर (वय 32, रा. नांदूर, जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राहुल जाधव तपास करत आहेत.