Fri, Apr 26, 2019 15:25होमपेज › Aurangabad › जवान नवनाथ चोपडे यांच्यावर अंत्यसंस्कार

जवान नवनाथ चोपडे यांच्यावर अंत्यसंस्कार

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 27 2018 11:57PMवैजापूर : प्रतिनिधी 

तब्बल अकरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक येथील जवान नवनाथ चोपडे यांच्यावर शासकीय इतमामात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता. जवान नवनाथ चोपडे अमर रहे... असा जयघोष करत चोपडे यांना निरोप देण्यात आला. 

तालुक्यातील बाभूळगाव बुद्रुक येथील जवान नवनाथ चोपडे (36) हे पत्नी व दोन मुलांसह आसाममधील रंगीया रेल्वेस्थानकातून गुहाटी ते मुंबई जाणार्‍या रेल्वेने पंधरा दिवसांच्या सुटीवर गावी येण्यासाठी निघाले होते. रेल्वेने येत असताना मध्यप्रदेशमधील जबलपूर रेल्वेेस्थानकात पाण्याची बाटली घेेण्यासाठी उतरल्यानंतर ते जवान चोपडे बेपत्ता झाले होते. ही घटना 17 मे रोजी घडली होती.

दरम्यान ते बेपत्ता झाल्यानंतर तब्बल अकरा दिवसांनंतर चोपडे यांचा मृतदेह सापडला. रविवारी लष्करी 169 रेजीमेन्टच्या तेरा जवानांनी लष्करी इतमामात त्यांना सलामी देण्यात आली. यानंतर त्यांचा अकरा वर्षीय मुलगा अनिकेत व नऊ वर्षीय मुलगी प्रियंका यांनी पार्थिवास अग्निदाह दिला. यावेळी उपस्थित जनसमुदायास अश्रूंना आवर घालणे कठीण झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

सहा महिन्यांनी होणार होते निवृत 

नवनाथ चोपडे हे सन 2003 साली जालना जिल्ह्यातील सैनिक भरतीमध्ये सैन्यदलात भरती झाले होते. सहा महिन्यांत ते सैन्यदलातून सेवानिवृत्त होणार होते. मात्र याअगोदरच काळाने त्यांना हिरावून नेले. त्यांचा मृतदेह सापडला खरा, परंतु मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.