Sat, Jul 20, 2019 15:19होमपेज › Aurangabad › जांगडगुत्ता : हुश्श, सुटला बाबा सलमान...

जांगडगुत्ता : हुश्श, सुटला बाबा सलमान...

Published On: Apr 08 2018 9:04AM | Last Updated: Apr 08 2018 9:04AMप्रदीप भागवत

हुश्श... सुटला बाबा एकदाचा सलमान. या सलमानबरोबरच त्याच्या फॅन्सनी देखील सुटकेचा निः श्‍वास सोडला, आम्ही पाहिलेना टीव्हीवर. तरुण-तरुणीच काय पण छोटी मुले-मुलीही जल्लोष करीत होते. कोणाला आपला प्रेम सुटल्याचा आनंद होता, तर कोणाला बजरंगी भाईजान, तर कोणाला सुलतान. दोन-तीन दिवसांपासून देशाला जणू काही सुतकच पडले होते. काही कामधंदा नाही, कोणताही मोठा प्रश्न नाही, सर्वांना सलमानचे काय होईल, कसे होईल, याच चिंतेने ग्रासले होते. आता आधीच सलमानचे लग्न होत नाही म्हणून तो राष्ट्रीय प्रश्न म्हणून होताच, त्यात आता काळवीट मारल्याचे हे प्रकरण. त्याला बेल मिळते की नाही, हा दुसरा मोठा राष्ट्रीय प्रश्न कधी झाला हे कोणालाच कळले नाही (टीव्हीवाले सोडून). टीव्हीवाल्यांनी मात्र आपले कॅमेरे रात्रंदिवस जोधपूर न्यायालय आणि जेलच्या बाहेर लावून ठेवले होते. पल पल की खबर ते आपल्याला देत होते.

मीराबाई चानूने कॉमनवेल्थमध्ये भारताला पहिले गोल्डमेडल जिंकून दिले त्यापेक्षा सल्लूभाई जमिनीवर कसा झोपला, तो उपाशीच कसा राहिला, त्याने सिगारेटीच कशा फुंकल्या या रंजक बातम्या दाखवून टीव्हीवाल्यांनी देशवासीयांवर अनंत उपकार केले. अखेर एवढा मोठा सेलिब्रिटीच्याच बातम्या लोक पाहणारना, त्याच्यापुढे कोण आहे ही मीराबाई चानू? आज तर एका न्यूज चॅनेलवर एका चिमुरड्या सलमान फॅन मुलीला होणारा त्रास पाहून आमच्या टीव्ही संचालासुद्धा पाझर फुटला हो. आम्ही स्वतः त्या पाझराचा उपयोग करून घेऊन कित्येक महिन्यांत साफ न केलेली टीव्हीवरची धूळ पुसून काढली. अगदी बजरंगीभाईजानची शप्पथ (अगदी बजरंगीभाई जानमधील त्या मुलीसारखा हात करून आणि मान खाली-वर हलवून). नाही तर उगाच म्हणाल अंधश्रद्धा वगैरे पसरवतो म्हणून. तर या दिल्लीच्या चिमुरडीने जेव्हापासून बजरंगी भाईजानला तुरुंगात टाकले तेव्हापासून म्हणजे तीन दिवसांपासून जेवणच केले नाही म्हणे. सारखे ती रडत होती. त्यातच ती बेशुद्धही पडली. हा तिचा व्हिडिओही व्हायरल झाला म्हणे. मग काय आई-वडील बिचारे फ्लाईटने तिला जोधपूरला घेऊन आले. त्या चिमुरडीला एकच चिंता... बजरंगी भाईजान बाहेर कधी येणार... बोला आता. तुम्ही म्हणाल असा वात्रटपणा आपण केला असता तर आपल्या आई-वडिलांनी दोन कानाखाली वाजवून गप्प केले असते. आपल्या आई-वडिलांकडे फ्लाईटचे पैसे कुठून येणार म्हणा. पण मंडळी या चिमुरडीचे पालक ठरले आजकालचे पालक. असो. तर असा हा सगळा सलमानचा महिमा.

त्याच्या फॅन्सवर त्याचे गारूड असे की, त्याने काहीही केले, त्याने कितीही नियम मोडले, तरी ते म्हणतील, बडे बडे सुपरस्टार्ससे ऐसी छोटी छोटी बाते हो जाती हैं. ते एवढे काय मनावर घ्यायचे. आता दोन काळविटं तर मारली, त्याने काय आकाश कोसळत नाही. एखाद्यावेळी सुसाट गाडी चालवून एखाद्याला चिरडले असेल, तर असे काय मोठे झाले? देशाची लोकसंख्या किती वाढलीय बघा. सलमान किती करोडो लोकांचे मनोरंजन करतो, ते बघा की. अशा माणसाला शिक्षा देणे कसे चुकीचे आहे, असे ते तुम्हाला नक्‍कीच पटवून देतील. उगाच ते बिष्णोई समाजवाले त्याच्या मागे हातपाय धुवून लागलेत. काळविटं तर मारलीत माणसं नाही ना, असे एका सलमानच्या चाहत्याने टीव्हीवर प्रतिक्रिया दिली आणि ती आम्ही पाहिली तेव्हाच धन्य झालो.  

Tags : blog, Jangadgutta, Salman Khan, Case, Bail, Court, Jodhpur