Tue, Mar 26, 2019 08:19होमपेज › Aurangabad › पोलिस निरीक्षकाच्या खुर्चीवर ‘जमाईराजा’

पोलिस निरीक्षकाच्या खुर्चीवर ‘जमाईराजा’

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:30AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दंगलीमुळे शहर पोलिसांवर सर्व स्तरातून आरोप होत आहेत. विरोधी पक्षनेत्यांसह स्थानिक नेत्यांनीही पोलिसांना टार्गेट केले आहे. त्यातच आता जिन्सी ठाण्यातील निरीक्षकाच्या खुर्चीवर कोणीतरी दुसराच बसल्याचा एक फोटो सोशल मीडियावरून समोर आला. त्यामुळे वेगळ्याच वादाला तोंड फुटले. 

या फोटोबाबत अधिक माहिती घेतल्यावर खुर्चीवर बसणारा  व्यक्‍ती ठाणेदारांचा नातेवाईक असल्याचे समजले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोणत्याही ठाणेदाराच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार हा फक्‍त त्यांच्यापेक्षा वरिष्ठांना असतो. वरिष्ठ ठाण्यात येताच ठाणेदाराने स्वतःहून त्यांना खुर्ची द्यावी, असा नियम आहे. 23 मार्च 2018 रोजी मुंबई पोलिसांनी दुर्धर आजाराशी लढा देत असलेल्या बिहार येथील आशिष बबलू मंडल (6) या चिमुकल्याला एक दिवसाचा पोलिस अधिकारी बनवून त्याची इच्छा पूर्ण केली होती. या हळव्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुकही झाले होते. मात्र, वरिष्ठ वगळता कोणीही व्यक्‍ती ठाण्यात आल्यावर ठाणेदाराने स्वतःची खुर्ची त्यांना देणे आणि आपण बाजूच्या खुर्चीवर बसणे, हा पोलिस मॅन्युअलचा भंग समजला जातो. विशेष म्हणजे, जो खुर्चीवर बसला त्याने रुबाबात फोटो काढला. तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावरून या फोटोचा गैरवापरही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जावयाची ऐट

सोशल मीडियातून समोर आलेला फोटो जिन्सी ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनचा असल्याचे दिसते. समोर फहीम हाश्मी (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) नावाची नेमप्लेट आहे. पाठीमागे महाराष्ट्र पोलिस लिहिलेला लोगो आहे. बाजूला जिन्सी ठाण्याच्या हद्दीचा नकाशा दिसत असून खुर्चीवर मात्र दुसराच कोणी तरी बसल्याचे दिसते. फोटो काढताना वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नेमप्लेट स्पष्ट दिसेल, याची खबरदारीही घेतली आहे. मात्र, हा फोटो कधी काढण्यात आला, ही माहिती समोर आलेली नाही. 

चौकशीनंतर कारवाई करू : श्रीरामे

ठाणेदाराच्या खुर्चीवर जमाईराजा बसल्याचा फोटो पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी उपायुक्‍त (परिमंडळ 2) राहुल श्रीरामे यांना याबाबत माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार, श्रीरामे यांनी माहिती घेतली असता हा फोटो जिन्सी ठाण्यातीलच असल्याचे समोर आले. त्यावरून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. त्यात शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती उपायुक्‍त श्रीरामे  यांनी दिली.