Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Aurangabad › कुख्यात बबलाचा पळालेला भाऊ जेरबंद

कुख्यात बबलाचा पळालेला भाऊ जेरबंद

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 13 2018 12:42AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पडेगावातील घरफोडी प्रकरणी अटक केल्यानंतर पोटदुखीमुळे घाटीत घेऊन गेेलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली होती. 5 मे रोजी ही घटना घडली होती. या आरोपीला छावणी पोलिसांनी मंगळवारी (दि. 12) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोरून अटक केली. शेख वाहीद शेख असद (20, रा. सईदा कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो खुनातील आरोपी कुख्यात बबलाचा छोटा भाऊ आहे. 

पलायन केल्यानंतर त्याने महिनाभर अजमेरला मुक्‍काम केल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरीफ खान दाऊद खान (26, रा. प्लॉट क्र. 25, पडेगाव, अन्सार कॉलनीतील) यांचे 27 मार्च रोजी मध्यरात्री आरोपी शेख वाहीद याने घर फोडले होते. दीड तोळे दागिने आणि 30 हजारांची रोकड असा ऐवज लांबवला होता. हा प्रकार 12 एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आला होता. यावेळी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या वाहीदला छावणी पोलिसांनी 3 मे रोजी हर्सूल कारागृहातून तपासासाठी ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्याला 7 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला सिटी चौक पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. 4 मे रोजी सायंकाळी त्याने पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितल्याने रात्री छावणी पोलिस ठाण्याचे जमादार शेख इस्माईल, ए. जे. शेख आणि ए. एन. माळी हे उपचारासाठी घाटीत घेऊन गेले होते. 

अपघात विभागात उपचार केल्यानंतर पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसताना त्याने जमादार शेख यांच्या हाताला झटका देत पलायन केले होते. या प्रकरणात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी वाहीदचा शोध सुरू होता. मंगळवारी छावणी पोलिसांना माहिती मिळाल्यावरून त्याला निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन मिरधे, बाबासाहेब सोळुंखे आणि शिवा क्षीरसागर यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

वाहीदविरुद्ध पाच गुन्हे...

घाटीतून पसार झाल्यानंतर वाहीद दोन दिवस शहरातच होता. पैशांची व्यवस्था होताच त्याने तत्काळ राजस्थानमधील अजमेर शहर गाठले. महिनाभर तो अजमेरला राहिला. मंगळवारी मालेगावमार्गे तो शहरात परतला. त्याच्यावर सातारा, क्रांती चौक, छावणी आणि फुलंब्री पोलिस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंग, चोरी आणि घरफोडीचे वेगवेगळे पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच, प्लंबरच्या खून प्रकरणात बबलासह त्याचा मोठा भाऊ अटक केलेला आहे. आता पळून जाणे आणि चोरी प्रकरणात पोलिसांनी बबलाच्या छोट्या भावालाही अटक केली.