Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Aurangabad › वैजापुरात सापडला ‘जेई’चा रुग्ण

वैजापुरात सापडला ‘जेई’चा रुग्ण

Published On: Mar 02 2018 1:04AM | Last Updated: Mar 02 2018 1:02AMवैजापूर : विजय गायकवाड

शहरातील शिवशंकरनगरमधील एका तीन वर्षीय चिमुकल्याला जेई (जॅपनीज इनसेफलायटीस) या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. यामुळे शहरासह आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील वैजापूर शहरात सापडलेला जेईचा हा पहिलाच रुग्ण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

आदित्य काशिनाथ गावित (3 वर्षे, रा. शिवशंकरनगर) असे या रुग्णाचे नाव आहे. शहरातील शिवशंकरनगरमधील रहिवासी आदित्यला ताप व झटके येऊ लागल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे आदित्यचे रक्तजल नमुने घेऊन पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले असता त्याला जॅपनीज इनसेफलायटीसची लागण झाल्याचे निदान झाले. सध्या आदित्यवर औरंगाबाद येथील दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. शहरातील शिवशंकरनगरसह परिसरात जलद ताप सर्वेक्षणासह कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, गायींसह म्हशी व डुकरांचे रक्तजल नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याशिवाय दैनंदिन सर्वेक्षण करून रुग्ण तपासणी करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवक एन. यू. नागे व ए. आर. शेजवळ हे दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत.