होमपेज › Aurangabad › मराठवाड्यात चार हजार कोटींची गुंतवणूक शक्य

मराठवाड्यात चार हजार कोटींची गुंतवणूक शक्य

Published On: Feb 10 2018 1:27AM | Last Updated: Feb 10 2018 12:50AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ प्रदर्शनानिमित्त मराठवाड्यात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक निश्‍चित समजली जात आहे. ‘एमआयडीसी’च्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयामार्फत गुंतवणुकीचे 127 सामंजस्य करार या परिषदेत केले जातील. या करारांतून 2,758 कोटी रुपयांची गुंतवणूक, तसेच 6,480 रोजगारांची निर्मिती होईल. बालकृष्ण टायर्स ही कंपनी 100 कोटींची तर ‘सीटीआर’ 7 कोटींची गुंतवणूक करून आपल्या प्रकल्पांचे विस्तारीकरण करणार आहे.

मुंबईत येत्या 18 फेब्रुवारीपासून तीन दिवसीय ‘मॅग्नेटि क महाराष्ट्र’ ही गुंतवणूक परिषद होणार आहे. मराठवाड्यातील उद्योगांचे शक्तिप्रदर्शन करणारे स्टॉल या परिषदेत लावले जाणार आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) उभारण्यात येत असलेल्या ऑरिक सिटीचे या परिषदेत मार्केटिंग केले जाणार आहे. या परिषदेनिमित्त मराठवाड्यात सुमारे चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, असा विश्‍वास ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी व्यक्त केला. 

रेल्वेचे डबे तयार करणार्‍या कंपनीला लातूर येथे एमआयडीसी 139 हेक्टर जमीन देणार आहे. याशिवाय बालकृष्ण टायर्सच्या वाळूज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी चार एकर जागा देण्यात आली आहे. बालकृष्ण टायर्स 100 कोटींची गुंतवणूक करणार असून, त्यातून दीड हजार जणांना रोजगार मिळेल. सीटीआर कंपनीने विस्तारीकरणासाठी शेंद्य्रात 15 एकर जमीन घेतली आहे. ‘सीटीआर’ सात कोटींपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करणार आहे. औरंगाबाद ऑटो अ‍ॅन्सलरीज ही कंपनी 9 कोटींची, संगकाज इंजिनिअरिंग 18 कोटींची, तर पॅरासन व्हेंचर ही कंपनी पैठणमध्ये 95 कोटींची गुंतवणूक करणार आहे. वरील कंपन्यांसह एकूण 127  जणांशी परिषदेत 2,758 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले जातील. याशिवाय ऑरिक सिटीतील गुंतवणूक ही वेगळी असणार आहे, असे वायाळ यांनी स्पष्ट केले.