Thu, Mar 21, 2019 11:06होमपेज › Aurangabad › मनपातील ३२ कोटींच्या धनादेश वाटपाची चौकशी

मनपातील ३२ कोटींच्या धनादेश वाटपाची चौकशी

Published On: Jan 05 2018 1:34AM | Last Updated: Jan 05 2018 1:04AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेचे सेवानिवृत्त लेखाधिकारी एन. जी. दुर्राणी यांनी दीड महिन्यात ठेकेदारांची तब्बल 32 कोटी रुपयांची बिले अदा केल्याची माहिती बुधवारी समोर आली होती. पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता ही बिले अदा करण्यात आल्याने चालू महिन्यात पालिका कर्मचार्‍यांच्या पगारासह वीज बिलाचेही वांदे होऊन बसले आहे. म्हणून आता महापौरांनी या बिल वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मनपाचे लेखाधिकारी दुर्राणी हे 30 डिसेंबर 2017 रोजी सेवानिवृत्त झाले. त्याआधी मुख्य लेखाधिकारी राम साळुंके रजेवर असल्याने 1 नोव्हेंबरपासून दुर्राणी यांच्याकडेच मुख्य लेखाधिकारी पदाचा अतिरिक्‍त पदभार सोपविण्यात आला होता. हा पदभार येताच दुर्राणी यांनी ठेकेदारांची थकीत बिले देण्याचा धडाका लावला. सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मात्र दुर्राणी यांनी कोणताही विचार न करता 1 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या दीड महिन्याच्या काळात 277 ठेकेदारांचे तब्बल 32 कोटी रुपयांचे बिल अदा केले आहे.

त्यामुळे सध्या पालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. परिणामी चालू महिन्यात मनपाला आपल्या कर्मचार्‍यांचे पगार करणे तसेच पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरणेही कठीण होऊन बसले आहे. या प्रकरणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्य लेखाधिकारी राम साळुंके आणि लेखाधिकारी संजय पवार यांना बोलावून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. दुर्राणी यांनी कोणकोणत्या ठेेकेदारांना बिले अदा केली, त्यांनी कधी कामे केली होती, बिले अदा करताना ज्येष्ठताक्रम पाळला का आदींची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय काही कामांची प्रत्यक्ष पाहणीही केली जाईल, असे महापौर घोडेले म्हणाले.