Tue, Jul 23, 2019 17:11होमपेज › Aurangabad › पर्यटन राजधानीत पोलिसांना मिळेना दुभाषी

पर्यटन राजधानीत पोलिसांना मिळेना दुभाषी

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:23AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद पोलिसांना थाई तरुणींची भाषा समजत नसल्यामुळे आणि थाई तरुणींनाही पुरेशी इंग्रजी येत नसल्यामुळे प्रोझोन मॉलमधील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटच्या तपासाला खीळ बसली आहे. आठ दिवसांनंतरही सर्टिफाईड दुभाषी न मिळाल्यामुळे पोलिसांची मोठी अडचण झाल्यामुळे आता पुण्यावरून दुभाषीआणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

औरंगाबाद शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी (दि. 7) प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा  व दी ट्रेस हब’ या दोन्ही ‘फॅमिली स्पा’मध्ये मसाज व कटिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी देहविक्री करणार्‍या थायलंडच्या नऊ व दोन स्थानिक तरुणी, तसेच ‘स्पा’चा मुख्य व्यवस्थापक शशांक खन्नासह या कृत्यात सहभागी असलेले ‘स्पा’चे कर्मचारी सुनील कचरू नवतुरे (27, रा. मिसारवाडी), शेख तौफिक शेख अफसर (23, रा. बायजीपुरा, संजयनगर), राहुल माणिकराव नलावडे (28, रा. मिसारवाडी) या 14 जणांसह चार ग्राहकांना अटक केली होती. तसेच, आठ लाख रुपये रोकड आणि मोबाइल, लॅपटॉप मिळून साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या वेळी पकडलेल्या चार ग्राहकांना जामीन मंजूर झाला असून त्यांना नियमित गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. आता तपास गुन्हे शाखा पोलिस करीत आहेत. 

दुभाषीमुळे पोलिसांना फुटला घाम

गुरुवारी पोलिसांनी विद्यापीठातून थाई भाषेची जाण असलेल्या एका व्यक्‍तीला आणले. त्यांच्याकडून तरुणींचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुभाषीने तरुणींशी संवाद साधल्यानंतर केवळ एकच बाजू समोर आली. दुभाषीआणि तरुणी एकाच देशातील असल्याने त्याने तरुणींचीच बाजू पोलिसांपुढे लावून धरली. यामुळे पोलिसांची मात्र, पुरती अडचण झाली. तपास अधिकार्‍यांना तर चक्‍क घामच फुटला होता. 

शशांक खन्ना तोंड उघडेना

गुन्हे शाखेकडे तपास आल्यानंतर गुरुवारी उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, विनायक ढाकणे, सहायक आयुक्‍त रामेश्‍वर थोरात यांनी थाई तरुणींची आणि व्यवस्थापक शशांक खन्ना याची चौकशी केली. शशांक खन्नाकडून अधिक माहिती मिळविण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत. परंतु, तो आणखीही तोंड उघडत नसल्यामुळे अनंतरा आणि दी स्ट्रेस हब या स्पा सेंटरचा मुख्य मालक डेरेक मछदो आणि विशाल शेट्टील (रा. मालाड, मुंबई) यांच्याबाबत जास्तीची माहिती पोलिसांना मिळाली नाही. 

चर्चा ताज महलच्या पुढे जाईना

पोलिस अधिकार्‍यांनी गुरुवारी थाई तरुणींचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी इंग्रजीमधून संवाद साधताना उपायुक्‍तांनी तरुणींना भारतात येण्याचा उद्देश काय? असा सवाल केला. त्यावर तरुणींनी ताजमहलच्या पर्यटनासाठी आल्याचे सांगितले. परंतु, पुढे भाषेशी अडचण झाल्याने संवाद पुढे सरकला नाही.