Sat, Jul 20, 2019 02:34होमपेज › Aurangabad › सर्वत्र कचर्‍याचे ढीग, राख आणि दुर्गंधी

सर्वत्र कचर्‍याचे ढीग, राख आणि दुर्गंधी

Published On: Mar 15 2018 1:55AM | Last Updated: Mar 15 2018 1:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ठिकठिकाणी पडलेला शेकडो टन कचरा, त्यातून सुटलेली दुर्गंधी, त्यावर बसलेल्या माशा, काही ठिकाणी जळालेल्या कचर्‍याची राख असे विदारक चित्र बुधवारी महापौरांसह इतर पदाधिकार्‍यांंच्या पाहणी दौर्‍यात  दिसले. त्यामुळे महापौरांसह इतर पदाधिकार्‍यांना नाक मुठीत धरूनच ही पाहणी करावी लागली.

शहराची कचराकोंडी तब्बल 27 व्या दिवशीही कायम आहे. ही कचराकोंडी फोडण्यासाठी मनपासह जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्‍तही कामाला लागले आहेत. तरीही आतापर्यंत हा प्रश्‍न निकाली काढण्यात यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल आणि सभागृह नेता विकास जैन यांनी बुधवारी सकाळी शहरातील विविध भागांत फिरून पाहणी केली. त्यांच्यासोबत अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्‍त विक्रम मांडुरके यांच्यासह मनपाचे इतर अधिकारीही होते. 

सेंट्रल नाक्यावरील स्थिती अतिशय विदारक बनली आहे. सध्या येथे मनपा इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकलेला आहे. शिवाय कचर्‍याने भरलेल्या 50 ट्रक देखील उभ्या आहेत. हा कचरा सडला आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण परिसरात माशांचा गोंगाट सुरू आहे. म्हणून येथे तातडीने औषध फवारणी करण्याच्या सूचना महापौरांनी अधिकार्‍यांना दिल्या. शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. बुढ्ढीलेन भागात पदाधिकारी, अधिकार्‍यांसमोरच एकाने कचरा पेटविला. अधिकार्‍यांनी तातडीने आग विझवून, त्याला रस्त्यावर टाकलेला कचरा उचलण्यास भाग पाडले. शहागंज, रेल्वेस्टेशन परिसरात एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागा पडून आहेत. त्या तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

शहागंज, बुढ्ढीलेन, रोशनगेट, पैठणगेट, औरंगपुरा भाजीमंडई, किलेअर्क, सिटी चौक, पदमपुरा, रेल्वेस्टेशन परिसरात पाहणी केली. सर्वत्र कचर्‍याचे जाळलेले ढीग आढळून आले. एक-दोन ठिकाणे वगळता कुठेही औषधींची फवारणी करण्यात आलेली नव्हती. महापौरांनी जाब विचारला असता, अधिकार्‍यांनी पावडर संपल्याचे तर बारवाल यांनी पावडर पडून असल्याचे सांगितले. सिडको-हडको भागात मात्र काही प्रमाणात स्वच्छता दिसून आली. 

पदमपुर्‍यात महापौरांना घेराव 

पदमपुरा भागात महापौरांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शेकडो टन कचरा पडून आहे. त्याला वारंवार आग लावण्यात येत आहे. त्यामुळे धूर पसरत आहे. या विरोधात विश्रामबाग भागातील काही महिलांनी महापौरांकडे धाव घेतली. सुरुवातीला त्यांनी वॉर्डात कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्याने या वॉर्डाचे नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती बारवाल यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. काही महिलांची महापौरांसोबत शाब्दिक चकमक झाली. मात्र नंतर महिलांनी नमते घेत महापौरांची माफी मागत वॉर्डातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची मागणी केली. 

खड्ड्यांमध्ये कचर्‍याची विल्हेवाट

मनपाने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करून त्याची विल्हेवाट लावणे सुरू केले आहे. आता यातील ओला कचरा ठिकठिकाणी खड्डे करून पुरला जात असल्याचे पाहणीत समोर आले. ठिकठिकाणी अशा पद्धतीने खड्ड्यात कचरा टाकून त्यावर माती टाकली जात आहे.