Mon, Nov 19, 2018 13:29होमपेज › Aurangabad › इनायतची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

इनायतची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

Published On: Dec 13 2017 2:37AM | Last Updated: Dec 13 2017 2:36AM

बुकमार्क करा

वैजापूर : प्रतिनिधी

वाळूज परिसरातील कुख्यात गुंड योगेश जोशी याचा खून केल्याच्या आरोपातून वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनधी यांनी वाळूज येथील सय्यद जुनैद सय्यद इनायत याची निर्दोष मुक्‍तता केली आहे. 5 रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.

एक डिसेंबर 2012 रोजी वाळूज परिसरात अहमदनगर रस्त्यावरील हॉटेल दावतसमोर रात्री दहा वाजेच्या सुमारास योगेश जोशी याचा खून झाला होता. घटनेनंतर वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्यंकटेश रणवीरकर यांच्या फिर्यादीवरून सय्यद जुनैद याला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी केला व गंगापूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पण खुनाचा गुन्हा सत्र न्यायालयात चालवला जात असल्याने हे प्रकरण वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षातर्फे सतरा साक्षीदार तपासण्यात आले. 

यात पंधरा साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाला आरोपीविरुद्व कुठलाही ठोस पुरावा सादर करता आला नाही. सरकारी पक्षाने परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाला सादर केले. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यादरम्यान जप्‍त करण्यात आलेला रक्‍ताने माखलेला चाकू, दगड व रक्‍ताचे कपडे आदी पुरावे संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपी सय्यद जुनैद सय्यद इनायत याच्याविरुद्धचा खुनाचा गुन्हा सिद्ध झाला नाही. त्यामुळे सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी सरकारी पक्षाचा युक्‍तीवाद सर्वोच्च न्यायालयाने  याआधी परिस्थितीजन्य पुराव्यावरून दिलेल्या निकालाचा हवाला देत अमान्य केला. आरोपी सय्यद जुनैद सय्यद इनायत (वय 35) याला खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्‍त करण्याचे आदेश दिले.