Thu, Jun 20, 2019 00:55होमपेज › Aurangabad › आता घरी बसून करू शकता पोलिसांत तक्रार

आता घरी बसून करू शकता पोलिसांत तक्रार

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 23 2017 1:32AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

डिजिटल इंडियाच्या मोहिमेत पोलिसही मागे नाहीत, हे दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 22) ई-तक्रार नोंदणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिक आता घरी बसून पोलिसांत तक्रार नोंदवू शकतात. तसेच, आपल्या तक्रारीचे स्टेट्स तपासू शकतात.  

महाराष्ट्र पोलिस दल हे डिजिटल सेवांकडे वाटचाल करीत आहे. त्यातूनच औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाने आधुनिकतेचे हे नवे पाऊल टाकले आहे. सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत सिटिझन पोर्टलद्वारे हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाला अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर. सोबत उपअधीक्षक चंद्रकांत अलसटवार, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस कल्याण विभागाचे निरीक्षक विजयकुमार सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, सपोनि. गणेश जामदार, किरण दांडगे, सीसीटीएनएसचे उपनिरीक्षक विलास हजारे आदींसह कर्मचार्‍यांची हजेरी होती. 

अशी करा तक्रार

ुुु.ाहिेश्रळलश.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर तक्रारदार यांना प्रथक आधारकार्ड व मोबाइल क्रमांकाच्या आधारे लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर मोबाइलवर वनटाईम पासवर्ड (ओटीपी) नंबर येईल. त्या माध्यमातून तक्रार टाईप करता येईल. त्यानंतर तक्रारदाराच्या मोबाइलवर सर्व माहिती मेसेजद्वारे येईल. विशेष म्हणजे, पोलिसांनी काय कारवाई केली, याची माहितीही संदेशाद्वारेच कळेल, असे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. 

या सुविधांचा मिळणार लाभ

सिटिझन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना 23 प्रकारच्या सुविधा देण्यात येतील. त्यापैकी 9 सुविधांसाठी लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर न करता लाभ घेता येणार आहे. यात एफआयआर (प्रथम खबर अहवाल) पाहणे, अटक आरोपींची माहिती, अनोळखी मृतदेहाची माहिती, हरवलेल्या व्यक्‍तींसंबंधी माहिती, मोबाइल चोरी, महाराष्ट्र पोलिस घटक स्थळांच्या लिंक, फरारी व्यक्‍तींची माहिती आदींचा समावेश आहे. इतर 14 सुविधांसाठी लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करूनच लाभ घेता येईल. यात तक्रार नोंदविणे, तक्रारीची सद्यःस्थिती पाहणे, भाडेकरूंची माहिती देणे, घरगुती नोकर तपासणी, मिरवणूक विनंती, चारित्र्य प्रमाणपत्र, वाहन चौकशी आदींचा समावेश आहे. 

गैरकारभाराला बसणार आळा

थेट पोलिस अधीक्षक तक्रार अर्ज घेऊन येणार्‍या नागरिकांची तक्रार या कक्षातून संबंधित पोलिस ठाण्याला पाठविली जाईल. तसेच, पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीही सिटिझन पोर्टलवर अपलोड करण्यात येतील. यामुळे वरिष्ठ तक्रार अर्जाची स्थिती नियमित पाहू शकतात. याशिवाय नागरिकांनी घरी बसून केलेल्या तक्रारी या कक्षात आल्यानंतर येथून पोलिस ठाण्यात पाठवून त्यावर कारवाईच्या सूचना देण्यात येणार आहेत, असे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.