होमपेज › Aurangabad › तीन महिन्यांत ४३१ गावांमधील जलयुक्‍तची कामे पूर्ण करण्याची घाई

तीन महिन्यांत ४३१ गावांमधील जलयुक्‍तची कामे पूर्ण करण्याची घाई

Published On: Dec 19 2017 1:18AM | Last Updated: Dec 19 2017 12:45AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत मराठवाड्यात यंदा निवडलेल्या दीड हजार गावांपैकी डिसेंबरअखेरपर्यंत साडेसहाशे गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत. तर साडेचारशे गावांमधील कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण होतील. उर्वरित साडेचारशे गावांमधील कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत यंत्रणांनी दिलेली आहे.

मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट नाही. त्यामुळे जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत हाती घेतलेल्या कामांचा विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकार्‍यांकडून होणारा पाठपुरावा कमी झालेला दिसून येत आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत जलयुक्‍तची कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

2016-17 या वर्षात मराठवाड्यातील 1518 गावे निवडण्यात आलेली असून, या गावांतील 72 हजार कामांना मंजुरी मिळालेली असून 15 डिसेंबरपर्यंत 42,743 कामे पूर्ण तर 7641 कामे सध्या सुरू आहेत. या कामांवर 519 कोटी 27 लाख रुपये खर्च झाला आहे. 15 डिसेंबरपर्यंत यातील 647 गावांमधील कामे पूर्ण करण्यात यंत्रणांना यश आले आहे, तर 440 गावांमधील कामे ही 80 टक्के पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरात ती कामे पूर्ण  होतील.

तर तब्बल 301 गावांतील कामे ही अर्ध्यावर आलेली आहेत. तर 130 गावांमध्ये कामांची गती खूपच संथ असल्याने या गावात 20-30 टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण झाल्याची माहिती विभागीय आयुक्‍तालयातून मिळाली आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत 431 गावांमधील कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकार्‍यांची धडपड सुरू झाली आहे.