Thu, Mar 21, 2019 15:29होमपेज › Aurangabad › दंगलप्रकरणी शिवसेना महामोर्चाच्या तयारीत

दंगलप्रकरणी शिवसेना महामोर्चाच्या तयारीत

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:20AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दंगलीच्या घटनेनंतर शहरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता शिवसेनेने दंगलप्रकरणी महामोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. दंगलीच्या घटनेत ज्या पोलिसांना शिवसैनिकांनी संरक्षण दिले, त्याच पोलिसांनी शिवसैनिकांना अटक करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असा आरोपही शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. 

शिवसेनेच्या शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांचा मेळावा बुधवारी तापडिया नाट्यमंदिरात पार पडला. या मेळाव्यास शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, माजी महापौर कला ओझा, रंजना कुलकर्णी, विजय वाघचौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दंगलप्रकरणी मोर्चा काढण्याबाबत पदाधिकार्‍यांनी याच मेळाव्यात सूतोवाच केले. या मोर्चाची तारीख आणि वेळ लवकरच निश्‍चित केली जाणार आहे. 

दंगलप्रकरणी मेळाव्यात पोलिसांच्या भूमिकेवर कठोर टीका करण्यात आली. शुक्रवारच्या दंगलीत पोलिसांना सपशेल अपयश आले. आता ते लपवण्यासाठी पोलिसांकडूनच शिवसेनेला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दंगलीत आम्ही मदत केली नसती तर पोलिसांची हानी झाली असती. आमचे उपकार विसरून तेच आता आम्हाला बदनाम करताहेत, असा आरोप खासदार खैरे यांनी केला. दानवे यांनीही पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक हाश्मी यांची भूमिका संशयास्पद आहे. या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जमाव दंगल घडत असताना हे हाश्मी बाहेर का आले नाहीत, रॉकेल बॉम्ब कोठून आले, शहरात एसआरपीची बटालियन असताना पोलिस अधिकारी जालन्याच्या एसआरपीची वाट का बघत बसले, असे सवाल दानवे यांनी केले. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. तसेच हा मोर्चा कोणालाही न घाबरता पैठण गेट, सिटी चौक, शहागंज मार्गे जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.