Tue, Jul 16, 2019 02:01होमपेज › Aurangabad › वाळूजमध्ये अवैध दारू विक्री जोमात

वाळूजमध्ये अवैध दारू विक्री जोमात

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:52AMवाळूज महानगर : प्रतिनिधी 

वाळूज औद्योगिक परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासन कानाडोळा करत असल्यामुळे  नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.
जोगेश्‍वरी, रांजणगाव शेणपुंजी, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव आदी ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी दारूची विक्री केली जाते. कामगार व युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूला ग्राहकी चांगली असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्‍तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. 

मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्‍या महिला, कामगार, विद्यार्थी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महिला व मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न दारुडे करतात. तक्रार देण्यास कुणी पुढे येत नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे. कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. व्यसन करणार्‍यांच्या घरात भांडणाचे प्रकार वाढले असून दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. विविध कारखान्यांत तसेच मिळेल त्या ठिकाणी रोजंदारी करून आलेली मजुरी कामगार दारूवर खर्च करीत आहेत.

दारू विक्री करणार्‍यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. वाळूज जोगेश्‍वरी येथे न्यू आंबेडकर व झोपडपट्टी, रांजणगाव शेणपुंजी येथे मुख्य रस्ता कृष्णानगर, एकतानगर, दत्तनगर, अर्जुनगर, पवननगर, पंढरपुरातील कामगार चौक, भाजी मंडई, वडगाव कोल्हाटी फुलेनगर आदी ठिकाणी खुलेआमे अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. शिवाय  अनेक हॉटेल, अंडा आम्लेटच्या हातगाड्यांवर रात्री उशिरापर्यंत दारूची विक्री करण्यात येते. दारू विक्रेत्यांकडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप  नागरिकांनी केला आहे. दरम्यान रांजणगाव येथील नागरिकांनी गावातील अवैध दारू विक्री थांबविण्यात यावी, यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावादेखील करण्यात आला होता.