Sun, May 19, 2019 12:25
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › वर्तमानपत्र, मासिकांपुरतीच मराठी मर्यादित

वर्तमानपत्र, मासिकांपुरतीच मराठी मर्यादित

Published On: Feb 27 2018 2:20AM | Last Updated: Feb 27 2018 2:06AMऔरंगाबाद : भाग्यश्री जगताप

स्पर्धेच्या युगामध्ये इंग्रजी ही गरजेची भाषा झाली आहे. परिणामी इंग्रजीमधील वाचन संस्कृती रूढ होत आहे, तर त्याउलट मराठी भाषेकडे युवक-युवतींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन जीवनात वर्तमानपत्र व काही ठराविक मासिकांपुरतीच मराठी वाचनसंस्कृती उरली की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मराठी भाषा दिनानिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांशी हितगुज केले असता, सर्वच अभ्यासक्रम हे इंग्रजी भाषेत असल्याने केवळ त्याच पुस्तकांचा अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मराठी भाषेचे वाचन हे केवळ वर्तमानपत्रातील बातम्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. ना कोणामध्ये कला साहित्य, संस्कृती याला जाणून घेण्याची आवडही दिसत नाही, ही खंत विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली.

भावना व्यक्‍त करण्यासाठी मराठी भाषेशिवाय दुसरे कोणतेच चांगले माध्यम नाही. मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबर्‍या वाचायला आवडतात. शिवाजी सावंत यांच्या जवळपास सर्वच कादंबर्‍या मी वाचल्या आहेत. 

- नम्रता हरकळ, विद्यार्थिनी

मराठी भाषा ही मायबोली आहे. त्यामुळे लहानपणापासून तिची आवड आहे. कादंबरी किंवा इतर पुस्तके वाचली नाहीत; पण दररोज वर्तमानपत्र तसेच मासिकांचे वाचन करते. 

- जयश्री क्षीरसागर, विद्यार्थिनी

मराठी ही घरात बोलली जाते, तसेच भावना व्यक्‍त करण्यासाठी मराठी भाषेचाच वापर केला जातो. त्यामुळे ती मायाळू भाषा वाटते. ऐतिहासिक कादंबर्‍या वाचल्या आहेत. त्यात प्रामुख्याने महाराणा प्रताप, श्रीमान योगी या आवडलेल्या कादंबर्‍या आहेत.

- संतोष मदन, विद्यार्थी

मराठी भाषेतील साहित्य तसे वाचलेले नाही; पण मी वर्तमानपत्रातील बातम्या रोज वाचते. तसेच दिवाळी अंकातील लेख वाचते.

- रेवती मोरे, विद्यार्थिनी

जुने मराठी साहित्य वाचण्यास आवडत नाही. आता केवळ वर्तमानपत्राचेच वाचन मी करतो.  

- मनीष बारी, विद्यार्थी

 मराठी भाषेतील पुस्तके शाळेत असताना वाचले आहेत. सध्या सर्व अभ्यासक्रम हा इंग्रजीतून असल्याने मराठी वाचायला वेळ मिळत नाही; पण तरीही वर्तमान पत्रातील लेख मात्र मी नेहमी वाचते.

- अशिता देशकर, विद्यार्थिनी