Mon, Jul 22, 2019 03:49होमपेज › Aurangabad › ...तर ‘मिनी भोपाळ’ घडले असते

...तर ‘मिनी भोपाळ’ घडले असते

Published On: Aug 15 2018 2:59PM | Last Updated: Aug 15 2018 2:59PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘त्या’ दिवशी जर वाळूज एमआयडीसीत पोलिस प्रशासनाने सतर्कता दाखविली नसती तर तेथे भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती. स्टरलाईट कंपनीतील केमिकलच्या साठ्याला हे हल्लेखोर लक्ष्य करीत होते. जर ते यशस्वी झाले असते तर औरंगाबादेत अभूतपूर्व अशी दुर्घटना घडली असती, असा खुलासा पोलिस आयुक्‍त डॉ. चिरंजीव प्रसाद यांनी केला. 

काही वर्षांपूर्वी भोपाळ येथे केमिकलच्या एका कंपनीत वायू गळती झाल्याने शेकडो निष्पाप नागरिकांना जीवाला मुकावे लागले होते. असाच धोकादायक साठा स्टरलाईट या कंपनीत आहे. 9 ऑगस्ट रोजी जेव्हा हल्लेखोर एमआयडीसीत घुसले, तेव्हा त्यांनी स्टरलाईटला लक्ष्य केले. या कंपनीत घुसून हल्लेखोरांना जाळपोळ करायची होती. अशा परिस्थितीत हल्लेखोरांना नियंत्रणात आणण्याबरोबरच पोलिसांनी कंपनी आणि तेथील केमिकलच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. तेथील बंदोबस्त इतरत्र हलविता आला नाही. जर आम्ही तेथून पोलिस बंदोबस्त हलविला असता किंवा जमावाच्या मागे तो लावला असता तर अनर्थ घडला असता आणि जमावाचा हाच प्लॉन होता. तसेच गुड ईअर टायर या कंपनीलाही हा जमाव टार्गेट करताना दिसून येत होता. 

या कंपनीत जाळपोळ करण्यात ते यशस्वी झाले असते तर तेथे असलेला टायरचा कच्च्या पक्क्या मालाची आग विझविण्यास दहा दिवसही पुरले नसते, असेही आयुक्त म्हणाले. आम्ही या कंपन्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. त्यामुळे पोलिस प्रशासन कमी पडले, असे म्हणता येणार नाही, असे आयुक्त म्हणाले. पोलिस प्रशासन कमी पडले असते हल्लेखोर आपल्या उद्देशात यशस्वी झाले असते आणि मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती, अशी भीतीही त्यांनी वर्तविली. 

एमआयडीसीसाठी नवे पोलिस ठाणे

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन रांजणगाव ठाण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू झाला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. उद्योगांना शंभर टक्के सुरक्षा देणे, हे पोलिसांचे काम आहे. त्यासाठी आम्ही अभ्यास करून एमआयडीसीत सहा ठिकाणी फिक्स पॉइंट उभे करणार असून सेक्टर सुरक्षेवर भर देण्यात येणार आहे. याशिवाय कंपन्यांचे गेट अधिक मजबूत करण्याबाबतही उद्योजकांना सूचना देण्यात आल्या आहेत.