होमपेज › Aurangabad › सिंघम येणार ...कहीं खुशी, कहीं गम !

सिंघम येणार ...कहीं खुशी, कहीं गम !

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 1:47AMऔरंगाबाद : विनोद काकडे

प्रशासकीय सेवेतील एक धडाकेबाज, कर्तव्यदक्ष, प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, सवर्र्सामान्यांना आपला वाटणारा अन् बदलीला न घाबरणारा अधिकारी अशी ‘इमेज’ असलेल्या सुनील केंद्रेकर यांची औरंगाबाद विभागीय आयुक्‍तपदी झालेल्या नियुक्‍तीने ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी अवस्था झाली आहे. या सिंघमच्या आगमनाने कामचुकार, भ्रष्ट ‘बाबू’मंडळींमध्ये चांगलीच धडकी भरली आहे, तर सर्वसामान्यांसाठी केंद्रेकरांचे आगमन दिलासादायक ठरणार हे नक्‍की!

सुनील केंद्रेकरांची आतापर्यंतची कारकिर्द ही चांगलीच वादळी आणि चर्चेची ठरलेली आहे. साईड पोस्टिंगला असले तरी तेथे कामातून वेगळेपणा सिद्ध करून दाखविणे, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. 2002 च्या बॅचचे आयएएस असलेल्या केंद्रेकर यांची औरंगाबादेत पहिल्यांदा विक्रीकर विभागाच्या सहआयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी येथील एक मोठा उद्योग समूह विक्रीकराच्या नावाखाली हेराफेरी करीत शासनाला कसा कोट्यवधींचा चुना लावत आहे, हे उघडकीस आणले होते. तो घोटाळा तब्बल 600 कोटींच्या आसपास होता.  त्याच काळात दोन महिन्यांसाठी त्यांच्याकडे औरंगाबादच्या प्रभारी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे आली. या दोन महिन्यांमध्ये केंद्रेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘बाबू’मंडळींना सुतासारखे सरळ केले होते. जिल्हाधिकारी असतानाही थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविणे, हा नवा पायंडा त्यांनी पाडला होता. 

बीडची अविस्मरणीय कारकिर्द

2012 मध्ये बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली. त्यावेळी बीडमधील प्रशासकीय कार्यालये नावालाच असायची. सर्व कामकाज राजकारण्यांच्या इशार्‍यावरच व्हायचे. केंद्रकरांनी सूत्रे स्वीकारताच आधी तेथील प्रशासकीय कामांमधील राजकारण्यांच्या हस्तक्षेपाला वेसण घातली. बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या     नावाखाली पोसण्यात येत असलेल्या राजकारण्यांच्या टँकरलॉबीला त्यांनी संपवून टाकले. चारा छावण्यांच्या नावाखाली सुरू असलेली कोट्यवधींची शासकीय लूट त्यांनी थांबविली. दररोज दिवसभर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेऊन नागरिकांच्या अडचणी जागच्या जागी सोडवू लागले. कधीच निघू न शकलेली बीड जिल्ह्यातील अतिक्रमणे त्यांनी स्वत: उभा राहून पाडली. त्यांच्या कामाच्या या पद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिक जे पूर्वी नेत्यांकडे आपली गार्‍हाणी मांडण्यासाठी जात होते, ते थेट केंद्रेकरांकडे जाऊ लागले. आपल्या अस्तित्वावरील हा घाला राजकारण्यांना सहन झाला नाही आणि मग सर्व पक्षीय राजकारण्यांनी एकत्र येत त्यांनी बदली केली. तेव्हा पहिल्यांदाच एखाद्या अधिकार्‍याची झालेली बदली रद्द करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली. बीडकरांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत केंद्रकरांची बदली रद्द करावी, यासाठी मोर्चा काढला होता, असे राज्यात पहिल्यांदाच घडले होते. 

सिडकोची कोट्यवधींची मालमत्ता वाचविली

बीड येथून केंद्रेकरांनी औरंगाबादला सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदली करण्यात आली.  सिडकोचा प्रभार स्वीकारताच केंद्रेकरांनी सिडकोच्या अनेकांनी बळकावलेल्या मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवून कामांचा धडाका सुरू केला. अतिक्रमण करून नागरिकांनी हडपलेली सिडकोची सुमारे दीड-दोनशे कोटींची मालमत्ता केंद्रेकरांनी वाचविली होती. 

बिघडलेल्या मनपाला लावली शिस्त

सिडकोचे मुख्य प्रशासक असतानाच औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्‍तपदाचा प्रभारी चार्ज दीड महिन्यासाठी केंद्रेकरांकडे सोपविण्यात आला. या दीड महिन्याच्या कालावधीत बिघडलेल्या मनपाला त्यांनी शिस्त लावली. दिवसदिवस गायब राहणारे अधिकारी, कर्मचारी वेळेच्या आत ड्यूटीला येऊ लागले. केंद्रेकरांनी शहरातील स्वच्छतेच्या कामावरही लक्ष केंद्रित केले. ते स्वत: पहाटे उठून साफसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात होते. शिवाय फुटकळ कामांच्या नावे अधिकारी, पदाधिकारी व कंत्राटदारांकडून होणारी कोट्यवधी रुपयांची लूट त्यांनी थांबविली. औरंगाबाद महापालिकेत कधी नव्हे ते इतके बदल केंद्रकरांच्या प्रभारी कालावधीत दिसून आले होते. 

‘कृषी’तील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला

सिडको मुख्य प्रशासकपदावरून केंद्रेकरांची बदली काही महिन्यांपूर्वी कृषी आयुक्‍तपदी झाली. साईड पोस्टिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या या ठिकाणीही केंद्रेकरांनी आपली छाप दाखविली. त्यांनी औरंगाबाद विभागातील ‘आत्मा’ व कृषी कार्यालयातील शेतकर्‍यांच्या अनुदानाचा घोटाळा उघडकीस आणला. हा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर केंद्रकरांची तडकाफडकी क्रीडा आयुक्‍तपदी बदली करण्यात आली होती. तेथून आता त्यांची बदली औरंगाबादच्या विभागीय आयुक्‍तपदी करण्यात आली आहे.